भावा...गर्दीत कर बहिणींचं रक्षण; कऱ्हाड बसस्थानकात युवकांना बांधल्या राख्या
By संजय पाटील | Updated: August 29, 2023 20:33 IST2023-08-29T20:33:02+5:302023-08-29T20:33:14+5:30
रक्षाबंधन हा बहिणी-भावाच्या नात्यातील पवित्र क्षण. हातात राखी बांधणारा भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचं कर्तव्य निभावत असतो.

भावा...गर्दीत कर बहिणींचं रक्षण; कऱ्हाड बसस्थानकात युवकांना बांधल्या राख्या
कऱ्हाड : बसस्थानकातील गर्दीत अनेकवेळा छेडछाडीचे, धक्काबुक्कीचे प्रकार घडतात. अशा घटनांना आळा बसावा. गर्दीत सापडलेली युवती आपल्या बहिणीसारखीच आहे, याची जाणीव युवकांना व्हावी, यासाठी कऱ्हाडात मंगळवारी दुपारी अनोखा उपक्रम राबविण्यात आला. बसस्थानकात महाविद्यालयीन युवतींनी युवकांना राख्या बांधत गर्दीत रक्षण करण्याची गळ घातली.
रक्षाबंधन हा बहिणी-भावाच्या नात्यातील पवित्र क्षण. हातात राखी बांधणारा भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचं कर्तव्य निभावत असतो. बहिण-भावाच्या नात्यातील या अनोख्या बंधाचा धागा पकडून कऱ्हाडात पोलिसांच्यावतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांच्या संकल्पनेतून निर्भया पथकाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. बसस्थानकात एसटीची वाट पाहत थांबलेल्या युवकांना महाविद्यालयीन युवतींनी राखी बांधली.
अनाहुतपणे हातात राख्या घेऊन युवती बसस्थाकात गेल्या. पाठीवर सॅक अडकवलेल्या या युवतींनी बसस्थाकातील बाकड्यांवर बसलेल्या युवकांना राखी बांधत गर्दीत तुम्हीच आमचं रक्षण करणारे भाऊ आहात, याची जाणीव करुन दिली. अनाहुतपणे हातात राखीचे बंध पडल्यामुळे यावेळी युवकही भावुक झाले. निर्भया पथकातील महिला पोलीस कर्मचारीही या अनोख्या रक्षाबंधन सोहळ्यात सहभागी झाल्या. बसस्थानकातच गर्दीच्या ठिकाणी रंगलेला हा अनोखा सोहळा पाहून उपस्थित प्रवासीही सुखावले. पोलिसांच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.