नगरच्या सर्पमित्राला कऱ्हाडचा दणका
By Admin | Updated: July 21, 2016 22:52 IST2016-07-21T22:52:39+5:302016-07-21T22:52:39+5:30
सोशल मीडियावर स्टंटबाजी : रोहन भाटे यांच्या तक्रारीनंतर वनखात्याकडून एकाला अटक

नगरच्या सर्पमित्राला कऱ्हाडचा दणका
सातारा/नगर : विनापरवाना सापांना पकडून त्यांना जवळ बाळगल्याने तसेच सोशल मीडियावर सापांसमवेत स्वत:चे फोटो प्रसारित केल्याने वनविभागाने अहमदनगर तालुक्यातील नागरदेवळे येथील आकाश जाधव याला अटक केली़ कऱ्हाड येथील रोहन भाटे यांनी याबाबत तक्रार केली होती. आरोपीला तालुका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडी देण्यात
आली़
आकाश जाधव हा गेल्या अनेक वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करत आहे़ साप व इतर वन्यप्राण्यांना पकडल्यानंतर त्यांची वनविभागात नोंद करावी लागते. तसेच ४८ तासांच्या आत त्यांना जंगलात सोडून द्यावे लागते़ आकाश जाधव याने मात्र, काही साप जवळ बाळगल्याचे व सोशल मीडियावर सापांसमवेत स्वत:चे फोटो प्रसारित केल्याची तक्रार कऱ्हाड येथील रोहन भाटे यांनी वनविभागाकडे केली होती़
या तक्रारीवरून जाधव याच्यावर कारवाई करण्यात आली. वनविभागाने दखल घेत येथील वनाधिकाऱ्यांना जाधव याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही कारवाई झाली आहे.
या कारवाईमुळे येथून पुढे वन्यप्राण्यांबद्दल स्टंटबाजी करणाऱ्यांना चपराक बसण्यास मदत होणार आहे, हे निश्चित आहे. (प्रतिनिधी)
अहमदनगर येथील सर्पमित्राने अशी अनेक ठिकाणी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. तो अंगलट आला आहे.
वन्यजीव कायद्याच्या विरोधात कृती...
‘सहायक वनसंरक्षक सुरेश दौंड यांच्यासह त्यांच्या पथकाने जाधव याला ताब्यात घेऊन चौकशी केली़ तसेच त्याचे फेसबुक अकौउंट तपासले असता यामध्ये जाधव याने सापांसमवेत प्रसारित केलेले छायाचित्र दिसून आले़ ही कृती वन्यजीव कायद्याच्या विरोधात असल्याने त्याला दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले़ जाधव याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली असून, पुढील चौकशी करून जाधव याच्यावर दोषारोपपत्र दाखल करणार आहे,’ असे दौंड यांनी सांगितले़