वाहतूक नियम तोडल्यास लायसन्स होऊ शकते रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST2021-09-13T04:38:32+5:302021-09-13T04:38:32+5:30

सातारा : वाहतूक नियमांचा भंग केल्यानंतर केवळ दंड भरून सुटका होते असे नाही तर अनेक वेळा लायसन्सही रद्द केले ...

Breaking traffic rules can lead to license revocation! | वाहतूक नियम तोडल्यास लायसन्स होऊ शकते रद्द!

वाहतूक नियम तोडल्यास लायसन्स होऊ शकते रद्द!

सातारा : वाहतूक नियमांचा भंग केल्यानंतर केवळ दंड भरून सुटका होते असे नाही तर अनेक वेळा लायसन्सही रद्द केले जाते. अशा बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक शाखेकडून सातत्याने कारवाई

करण्यात येत असून, वर्षभरात २५८ जणांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आलंय. त्यामुळे वाहन चालविताना मद्यप्राशन करणाऱ्या आणि मोबाइलवर बोलणाऱ्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन न केलेलेच बरे.

वाहन चालविताना या ना त्या कारणाने अनेकदा वाहतूक पोलिसांशी संपर्क येत असतो. पोलिसांनी आपली गाडी अडविल्यानंतर आपण दंड भरून आपली सुटका करून घेतो; पण याही पलीकडे कारवाई होते. हे अनेकांना माहितीही नाही. विशेषत: वाहन चालविताना मद्यप्राशन करणे हा गंभीर गुन्हा आहे. तरीसुद्धा अनेक वाहन चालक नियम तोडून सार्वजनिक ठिकाणी वावर करत असतात. असे वाहनधारक स्वत:च्या नुकसानीसह दुसऱ्यांच्याही जीवितास धोका निर्माण करत असतात. यामुळे अशा वाहनधारकांवर वाहतूक शाखेचा विशेष ‘वाॅच’ असतो.

चाैकट : हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन

वाहन चालविताना मद्यप्राशन करणे.

वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे.

सातत्याने नियमांचे उल्लंघन करणे.

सार्वजनिक ठिकाणी अडथळा येईल, असे वाहन उभे करणे.

चाैकट : आधी तीन महिने, नंतर कायमस्वरूपी

अनेक वाहन चालक सातत्याने नियमांचे उल्लंघन करत असतात. एकदा, दोनदा अशा वाहन चालकांना सुधारण्याची संधी देतात. सुरुवातीला तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द केले जाते. त्यानंतर वारंवार गुन्हा घडल्यास कायमस्वरूपी लायसन्स उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रद्द केले जाते.

चाैकट : अशी होते कारवाई

वाहतूक पोलिसांकडून ज्या वाहनधारकावर कारवाई केली आहे, त्या वाहनधारकाचा प्रस्ताव तयार केला जातो. हा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पाठविला जातो. या ठिकाणी वाहनधारकाचे समुपदेशनही केले जाते. मात्र, वाहनधारक सातत्याने नियम तोडत असेल तर त्याचे आधी तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द केले जाते.

कोट : सातारा शहरातून रोज दोन ते तीन लायसन्स रद्द करण्याचे प्रस्ताव आम्ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पाठवत असतो. यामध्ये वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांचा यात समावेश असतो.

-विठ्ठल शेलार, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, सातारा

चाैकट : चार वर्षांतील कारवाई

वर्षे - लायसन्स निलंबन

२०१८- ३९८

२०१९- ३५६

२०२०-२८५

२०२१-२५८

Web Title: Breaking traffic rules can lead to license revocation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.