कॉपीराईट कायद्याचा भंग; केबलमालकावर गुन्हा
By Admin | Updated: January 8, 2016 01:13 IST2016-01-07T22:41:47+5:302016-01-08T01:13:46+5:30
इ.आय.पी.आर. इंडियाच्या अधिकाऱ्यांनी व शिरवळ पोलिसांनी आझाद केबलच्या कार्यालयावर छापा टाकला

कॉपीराईट कायद्याचा भंग; केबलमालकावर गुन्हा
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील आझाद केबल नेटवर्कवर अनधिकृतपणे स्टार चॅनेलचे प्रक्षेपण दाखवित कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी केबलमालकावर शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद गफूर खान (रा. शिरवळ, ता. खंडाळा ) असे गुन्हा दाखल झालेल्या केबलमालकाचे नाव आहे. यावेळी पोलिसांनी ९५ हजार रुपयांचा केबल मशिनचा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील आझाद केबल नेटवर्कचे मालक जावेद गफूर खान यांच्याशी स्टार कंपनीचा करार ३१ जून २०१५ रोजी संपला होता. कंपनीने जावेद खान यांना नवीन करार करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. मात्र जावेद खान यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे स्टार कंपनीने आझाद केबल नेटवर्कला दिलेले वितरणाचे हक्क खंडित केले. दरम्यान, भोर येथील केबलचालकाकडून स्टार चॅनेलचे आझाद केबल नेटवर्कवर जावेद खान हे अनधिकृतपणे वितरण करीत असल्याची माहिती मुंबई येथील स्टार कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार कंपनीच्या ई.आय.पी.आर. इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सातारा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना याबाबतची कल्पना दिली. त्यानुसार इ.आय.पी.आर. इंडियाच्या अधिकाऱ्यांनी व शिरवळ पोलिसांनी आझाद केबलच्या कार्यालयावर छापा टाकला. यावेळी स्टार चॅनेलचे अनधिकृतपणे प्रक्षेपण सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित ठिकाणी असणारी प्रक्षेपणाची ७५ हजार रुपये किमतीचे तीन ट्रान्समीटर, १० हजार रुपये किमतीचे रिसिव्हर, ५ हजार रुपये किमतीचा डीव्हीडी प्लेअर व ५ हजार रुपये किमतीचे आॅप्टिकल नोड असा ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार संतोष मठपती हे करीत आहे. (प्रतिनिधी)
सल्लागाराचा हप्ता चालू करण्याचा सल्ला
शिरवळ पोलीस ठाण्यात केबलचालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असताना कंपनीचा कायदेशीर सल्लागार असणाऱ्या व मुंबई येथील निवृत्त पोलीस निरीक्षक टोपकर नाव असणारा एक जण पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांच्या नावाने दमबाजी करण्यात मश्गुल होता. केबलचालकाला पाहून जोरदार हसत सल्लागार केबलचालकाला म्हणाले, ‘शिरवळ येथील पोलीस निरीक्षकाला तू भेटलेला दिसत नाहीस. येथेही हप्ता सुरू कर. तू जर कार्यालयात भेटला असतास तर ही कारवाई झालीच नसती, असे सांगत हप्ता सुरू करण्याचा अजब सल्ला दिला.