‘खादी’च्या मेहरबानीने बाटली उभी !
By Admin | Updated: January 16, 2015 23:47 IST2015-01-16T21:05:55+5:302015-01-16T23:47:20+5:30
खाकी कमजोर, विक्रेते शिरजोर : बंदी असूनही चाफळ भागात दारूचा पूर, पोलिसांना ‘मामा’ बनविण्याचा प्रकार

‘खादी’च्या मेहरबानीने बाटली उभी !
चाफळ : विभागात पुन्हा एकदा अवैध दारुविक्रीला ऊत आला असून, दारूबंदी असणाऱ्या सूर्याचीवाडी, वाघजाईवाडी व कडववाडीत सध्या दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे. त्यामुळे ‘पोलीस कमजोर, दारूविक्रेते शिरजोर’ असे चित्र पाहावयास मिळत आहे. काही महिन्यांपासून चाफळ विभागात अवैध दारूविक्रीला ऊत आला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अवैध दारुविक्रीमुळे गावांचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. काही स्थानिक नेत्यांचे अभय मिळत असल्याने दारु व्यावसायिक पोलिसांना न जुमानता राजरोसपणे दारुविक्री करीत पोलिसांना आव्हान देत आहेत. सूर्याचीवाडी येथे एका राहत्या घरामध्ये राजरोसपणे दारुविक्री सुरु आहे. या व्यावसायिकाने दारुविक्रीसाठी नामी शक्कल लढविली आहे. आपल्या पत्नी व नातवांकरवी संबंधित व्यावसायिक दारूविक्री करीत आहे. हा व्यावसायिक पंधरा वर्षांपासून दारुविक्री करीत असल्याचे छातीठोकपणे सांगत असून मोठ्या आविर्भावात तो पोलिसांवर रूबाब झाडताना दिसून येत आहे. त्याच्याकडून पोलिसांनाही ‘मॅनेज’ केले जात असल्याची चर्चा आहे. या दारू व्यवसायामुळे गावातील अनेक महिलांचे संसार उद््ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, त्याचे प्रशासनासह स्थानिक नेत्यांनाही काहर देणे घेणे नसल्याचे दिसून येते. कडववाडी व वाघजाईवाडी येथील दारुविक्रेत्यांनीही आपली पथारी पसरली आहे. झटपट पैसे मिळविण्यासाठी त्यांनी नामी शक्कल लढवत चक्क रस्त्याकडेलाच दारूचा अड्डा बनविला आहे.पोलिसांना ‘मामा’ बनवण्याचा उघोग वाघजाईवाडीतील एका व्यावसायिकाने मोठ्या थाटात सुरु केला आहे, तर येथील दुसऱ्या व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरातच दारूचा अड्डा बनवला आहे. हा व्यावसायिक आपल्या कुटुंबीयांकरवी दारुविक्री करत आहे.समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महारांजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या चाफळ विभागास राम मंदिरामुळे मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा या भूमीमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात. परंतु या दारुविक्रेत्यांमुळे गावांची शांतता भंग पावत चालल्याने याचाच विचार करुन गावातील तरुण व महिलांनी एकत्र येऊन गावातील उभी बाटली बहुमताने आडवी करणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनानेही ग्रामस्थांना सहकार्य करणे आवश्यक आहे. (वार्ताहर)
आधी मद्यप्राशन, मग मारामारी
धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या चाफळ विभागाची राममंदिरामुळे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळ्ख आहे. असे असताना या तिन्ही गावांतील शांतता दारू व्यवसायामुळे भंग होत आहे. या दारु अड्ड्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. दारूमुळे काही गावात यापूर्वी मारामारीच्या घटना घडल्या आहेत. हे सारे जगजाहीर असूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.