बॉम्बशोधक तरुणाच्या अंतरंगात सप्तसुरांचे ‘स्फोट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2016 00:26 IST2016-01-27T23:10:23+5:302016-01-28T00:26:37+5:30
तू ही रे... : पल्लेदार आवाजाची देणगी लाभलेल्या महेश पवारांच्या शैलीवर मित्रांसह कलावंतही खूश

बॉम्बशोधक तरुणाच्या अंतरंगात सप्तसुरांचे ‘स्फोट’
राजीव मुळ्ये - सातारा --वयाच्या एकोणीसाव्या वर्षी अंगावर खाकी वर्दी चढली. बंदोबस्त, गस्त सुरू झाली. पण खाकीच्या आत लपलेला हरहुन्नरी कलावंत आलाप-ताना घेत राहतो. वर्दीतले मित्र आणि वरिष्ठच नव्हे, तर संगीताच्या क्षेत्रात आहोरात्र वावरणारे कलावंतही म्हणतात, ‘वाह, जवाब नही! काय रेंज आहे आवाजाला!’महेश रामचंद्र पवार. बत्तीस वर्षांचा गुणी कलावंत. सांगली जिल्ह्यातलं कर्नाळ हे मूळ गाव. शेतकरी कुटुंबातल्या महेश पवार यांनी ठरवलं होतं, लष्करात किंवा पोलिसात भरती व्हायचं आणि देशसेवा करायची. लष्करात संधी मिळाली नाही; पण अवघ्या एकोणीसाव्या वर्षी, २००३ मध्ये ते पोलिसात भरती झाले. आज बॉम्बशोधक आणि विनाशक पथकात (बीडीडीएस) कार्यरत असलेल्या पवार यांची सप्तसुरांची मैत्री फार उशिरा झाली. खरं तर आपण उत्तम गायक आहोत, याची जाणीवच त्यांना कधी नव्हती. सहकाऱ्यांनी ती करून दिली आणि मग वेळ मिळेल तेव्हा आणि संधी मिळेल तिथं ते गाऊ लागले. ड्यूटी कधीही, कुठेही लागू शकते; त्यामुळं तीव्र इच्छा असूनही संगीताचं औपचारिक शिक्षण घेता येत नाही, याची सल मनात ठेवून ते मित्रांच्या संगतीत शक्य होईल तेव्हा मैफल जमवतात.
शिक्षण सुरू असताना आपल्यातल्या कलेची त्यांना पुसटशीही जाणीव झाली नव्हती. पोलिसात भरती झाल्यावर नानवीजला (दौंड) वर्षभराचं प्रशिक्षण सुरू होतं. इनडोअर, आउटडोअर प्रशिक्षण झालं की फावल्या वेळात मित्रांचे जोक, किस्से, गाणी सुरू व्हायची. इथंच आपल्यातील गायकाची पहिली ओळख महेश यांना झाली. मित्र आग्रह करकरून गाणं म्हणायला लावू लागले.
विठ्ठल जाधव साताऱ्याचे पोलीस अधीक्षक असताना कर्मचाऱ्यांमधलं टॅलेन्ट ओळखून त्यांनी एका आॅर्केस्ट्राची कल्पना मांडली होती. मदतीला पोलीस बँडमधले कलावंत होते. महेश पवार या आॅर्केस्ट्रात हिरीरीनं सहभागी झाले. तालमी सुरू झाल्या. दुर्दैवानं या आॅर्केस्ट्राचा ‘स्टेज शो’ होऊ शकला नाही; पण पोलिसी वर्दीतल्या अनेकांना स्वत:मध्ये दडलेल्या कलावंताची जाणीव या निमित्तानं झाली.
वीरेंद्र केंजळे हे साताऱ्यातील हरहुन्नरी कलावंत. गायक-वादक आणि बरंच काही. त्यांनी महेश पवार यांचा आवाज ऐकून एकदा त्यांना आपल्या कार्यक्रमात गाण्याची संधी दिली. ‘बॉम्बे’ चित्रपटातलं ‘तू ही रे...’ हे सूर-तालाच्या बाबतीत अत्यंत अवघड गीत महेश यांनी सादर केलं. गाणं ऐकल्यावर महेश यांच्या आवाजाच्या पल्ल्याची (रेंज) वीरेंद्र केंजळे यांनी तोंडभरून स्तुती केली. संगीताचं औपचारिक शिक्षण आणि रियाज महत्त्वाचा असल्याचं त्यांनी महेश यांना पटवून दिलं.
त्यानंतर महेश यांनी दोन वेळा, दोन ठिकाणी गाण्याचा, हार्मोनियमचा क्लास लावला. फीसुद्धा भरली; पण बदलत्या ड्यूटीमुळं क्लासची वेळ पाळणं शक्य होत नव्हतं. अखेर पोलिसाचं कर्तव्य महत्त्वाचं मानून महेश यांनी औपचारिक संगीत शिक्षण घेण्याचे प्रयत्न तात्पुरते थांबवले.
बॉम्बशोधक पथकात कार्यरत असले तरी यात्रा, निवडणुका, दौरे असं काही ना काही वर्षभर सुरू असतं. त्या-त्या ठिकाणी ड्यूटीला जावं लागतं. चार-पाच दिवस बाहेर मुक्काम करावा लागतो. पण अडचणीतून मार्ग काढून शास्त्रीय संगीत शिकण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे.
बोटांनाही हार्मोनियमचा लळा
महेश पवार यांना संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नाही. शेतकरी कुटुंब, अभ्यास, परीक्षा अशा ठाशीव मार्गानं ते पोलीस दलात पोहोचले. परंतु गाण्याबरोबरच त्यांची बोटं हार्मोनियमवर अत्यंत सुरेख चालतात. भविष्यात गाण्याबरोबरच हार्मोनियमचाही क्लास लावून त्यांना संगीतात मोठी मजल मारायची आहे.
‘ते’ मोबाइलवर ऐकतात गाणी
नानवीजला प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असताना ज्यांनी महेश पवार यांची गाणी ऐकली, त्यातलं कुणीच त्यांना विसरू शकत नाही. त्यातील एका अधिकाऱ्याकडे महेश यांच्या गाण्याच्या क्लिप अजूनही आहेत. सवड मिळेल तेव्हा हे अधिकारी महेश यांना मोबाइलवर फोन करतात आणि ‘गाणं म्हण’ असं सांगतात. महेशही आढेवेढे न घेता आडबाजूला जाऊन गाऊ लागतात. हीच त्यांच्या आवाजाला मिळालेली खरी पावती!
...आणि अचानक मैफल रंगली
महेश पवार एकदा मित्रांसमवेत हॉटेलमध्ये जेवायला गेले. शेजारच्याच टेबलवर कुणाच्यातरी वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू होतं. लोक गात होते. महेश यांना गाणं म्हटल्याखेरीज राहवेना. ओळख काढून तेही गाणं म्हणायला सरसावले. त्यांची गायकी ऐकून सर्वच उपस्थितांनी तोंडात बोटं घातली. दोन्ही टेबलचं बिल त्याच टेबलवरच्या एका व्यक्तीनं गुपचूप भरलं. या मैफलीनंतर दोन-तीनदा त्या व्यक्तीनं हॉटेलच्या रूममध्ये बोलावून घेऊन गायला लावलं.