गावात उकाडा; मांडवात मात्र ‘गारवा’..!
By Admin | Updated: June 5, 2015 00:13 IST2015-06-04T23:04:16+5:302015-06-05T00:13:03+5:30
लग्नात आता ‘थंडगार पाणी’ : बर्फाचा वापर ; ग्रामीण भागात ठंडा-ठंडा कूल

गावात उकाडा; मांडवात मात्र ‘गारवा’..!
कऱ्हाड : सध्या कडक उन्हाळा असल्याने ग्रामीण भागातील लोकांपुढे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या उभी आहे. एकीकडे ग्रामीण भागात असलेले ओढ, नाले, तलाव, विहिरी देखील आटल्याने पाणी टंचाई भासत आहे. तर दुसरीकडे याच्या विरोधात शुभकार्यात पाण्याचा अपव्यय केला जात आहे. त्यामुळे यजमानांच्या तोंडचे पाणी पळू नये यासाठी वर पक्ष अथवा वधू पक्षाकडील लोकांकडून गावात पाण्याचा दुष्काळ पडला असला तरी मांडवात मात्र ‘गारवा’ राहण्यासाठी बाहेरून पाणी आणून त्यात थंडगार बर्फ वापरण्याची नामी शक्कल लढवली जात आहे.
लग्नात वऱ्हाडी मंडळींना हाल सोसावे लागू नये, तसेच त्यांच्या खातीरदारीत कोणतीही कमी पडू नये म्हणून वर तसेच वधूपित्यांकडून नामी शक्कल लढवली जात आहे. कडक उन्हामध्ये मांडवात गारवा निर्माण करण्यासाठी सुगंधी अत्तरासह पंख्यांचा वापर, बर्फाचा वापर करण्यात येत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्यामध्ये थंडगार बर्फ टाकून पाणी थंड केले जात आहे. त्यामुळे वऱ्हाडी मंडळी मात्र खुश होत असल्याचे दिसत आहे. असे असलेतरी याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. तरीही ऐन उन्हाळ्यात आपल्या पाहुण्यांना कशाचीही कमतरता भासू नये यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे.
कडक उन्हामध्ये बर्फाचे पाणी घेतल्यास आजारी पडण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. हे माहिती असूनसुद्धा लग्नकार्यात थंडपाणाचा वापर हमखास केला जात आहे. तर दुसरीकडे कोकणात प्रथेप्रमाणे तुळसी विवाहानंतर लग्न सोहळ्यास प्रारंभ होत असला, तरी खऱ्या अर्थाने लग्नसराई मार्च ते मे या कालावधीतच असते. पाणी टंचाईची समस्याही याच महिन्यात अधिक तीव्रतेने भेडसावू लागते.
वधू अथवा वर पक्षाच्या दारात जर लग्न असेल तर उन्हाळ्यात पैपाहुण्यांना पाण्यापासून ते जेवणापर्यंत कोणताही त्रास होवू नये यासाठी सर्वाेतोपरी उपाययोजना या केल्या जात आहेत. यामधील एक म्हणजे पिण्याच्या पाण्यात थंडगार बर्फ टाकून तसेच स्वागताच्यावेळी आईस्क्रीम व सरबत यांचे वाटप केले जात आहे.
पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. यासाठी लग्न तसेच इतर कोणते कार्यक्रम शहरातील तसेच भागातील हॉलमध्ये घेतले जात असल्याचे दिसून येत आहे.
लग्नकार्यात थंडगार पाण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त बर्फाचा वापर केला जात असल्याने लोकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. थंडगार पाणी पिल्याने लोकांना सर्दी, ताप, खोकला, घसा बसणे, डोके दुखणे असे आजार होण्याची शक्यता वाढत आहे. तापत्या उन्हामध्ये थंडगार पाणी पिल्याने शरीरावर त्याचा वाईट परिणाम होत आहे.
सध्याच्या काळात ग्रामीण भागात होणाऱ्या लग्न समारंभात पिण्याच्या पाण्यात बर्फ वापरण्याचे प्रमाण वाढले असल्याने लोकांना अनेक आजारांना सामोरे जावं लागत आहे. या थंडगार पाण्यासाठी लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
अनेकजण हौसेपोटी अशा नामी शकला लढवत असल्याने त्यांची हीच नामी शक्कल अनेकांसाठी आजार देणारी ठरत आहे. त्यामुळे यावर वेळीच विचार करणे महत्वाचे ठरलेले आहे. (प्रतिनिधी)
मंगलकार्यालयात होतो याचा जास्त वापर
सध्या गावागावांत लग्नकार्ये जोरात सुरू आहेत. ग्रामीण भागातील मंडळींकडून देखील बदललेल्या स्थितीप्रमाणे खेड्यात लग्न न घेता ते शहरात घेण्याची इच्छा होत आहे. वर आणि वधूपक्षाकडील लोकांना सोयीस्कर ठरेल अशा ठिकाणी लग्नं घेतली जात आहेत. आकर्षक हॉलसह थंडगार पाणी व टेबल-खुर्चीवर बसून जेवण अशा सुविधा शहरातील हॉलमध्ये दिल्या जात असल्याने ग्रामीण भागातील लोकांकडून हॉलला जास्त पसंती दिली जात आहे.
थंडगार पाण्यामुळे होतायेत ‘आजार’...
लग्नकार्यात जास्त प्रमाणात बर्फाचा वापर करून पाणी थंडगार केले जात आहे. थंडगार पाणी पिल्याने लोकांच्या घशातील स्नायूंचा संकोच होऊन घशाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. या संसर्गातून सर्दी, पडसे होण्याची दाट शक्यता असते. बर्फाचा गोळा तसेच त्यापासून तयार केलेले थंडगार पाणी पिल्याने विषारी संसर्गाचा धोका जास्त प्रमाणात संभवतो. कारण बर्फ तयार करण्यासाठी वापरलेले पाणी हे स्वच्छ आहे की नाही याची खातरजमा केलेली नसते.