बोअर एकीकडे, पाणी दुसरीकडे !-- आले आनंदाश्रू
By Admin | Updated: December 16, 2014 00:13 IST2014-12-15T22:26:02+5:302014-12-16T00:13:24+5:30
अहो आश्चर्यम : खटाव तालुक्यातील गोपूज येथील अद्भूत घटना

बोअर एकीकडे, पाणी दुसरीकडे !-- आले आनंदाश्रू
औंध : गोपूज, ता. खटाव येथे डॉ. रामचंद्र घार्गे यांच्या घरी बोअरवेल घेण्याचे काम सकाळी १०.३० पासून सुरू होते. बोअर मशीन सुरू झाल्यानंतर ६० फूट इतके खोल गेल्यानंतर त्यांच्याच शेजारी असलेले लक्ष्मण बाबूराव चव्हाण यांच्या घराशेजारील बोअरमधून थोडे-थोडे पाणी अचानकपणे वर येऊ लागले. चव्हाण कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजारपाजाऱ्यांच्या मदतीने आपल्या बोअरमधील मोटर वर काढली. मोटर काढल्यानंतर दहा मिनिटांच्या आतच पाण्याचा वेग वाढला व चव्हाण यांच्या बोअरमधून आपोआपच सुमारे वीस फूट उंचीने पूर्ण बोअरवेलमधून फवारे सुरू झाले. यामुळे बोअर एकीकडे आणि पाणी दुसरीकडे अशी चर्चा सुरू झाली.
ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पोहोचली आणि स्टँड परिसरात जत्रेचे स्वरूप आले. अचानक वीस फुटांच्या कारंज्याने लोक भारावून गेले. काहीनी तर दैवी चमत्कार समजून त्यापुढे नतमस्तक झाले. डॉ. घार्गे यांच्या बोअरला पाणी लागले; परंतु चव्हाण यांच्या बोअरमधून येणारे फवारे घार्गे यांची बोअर सुरू होती तोपर्यंत चालू होते.वडूज-कऱ्हाड या राज्य मार्गालगतच घडलेल्या या दृश्यामुळे येणारे-जाणारे आवर्जून थांबत होते. आपल्या मोबाईलवर जो तो फोटोसेशन, शूटिंग करत होता. या फवाऱ्यामुळे परिसर संपूर्ण जलमय झाला. (वार्ताहर)
आले आनंदाश्रू
कायम दुष्काळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या खटाव व तालुक्यातील या गावांतील या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना हे पाणी पाहून आनंदाश्रू आवरता आले नाहीत.