नदीत आढळलेला मृतदेह मुलाचा नव्हे मुलीचा
By Admin | Updated: July 6, 2017 14:22 IST2017-07-06T14:22:44+5:302017-07-06T14:22:44+5:30
पोलिसांनी पंचनामा बदलला : ओळख पटविण्याचे आव्हान

नदीत आढळलेला मृतदेह मुलाचा नव्हे मुलीचा
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. ६ : येथील संगम माहुली नदीत आढळलेला मृतदेह मुलाचा नसून दहा वर्षाच्या मुलीचा असल्याचे शवविच्छेदन अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे.
संगम माहुली नदीमध्ये बुधवारी सायंकाळी काही ग्रामस्थांना नदीकाठी मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. मात्र मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी अंदाजे अकरा वर्षाच्या मुलाचा मृतदेह असल्याचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. मात्र या ठिकाणी शवविच्छेदन अहवालामध्ये हा मृतदेह मुलाचा नसून अंदाजे दहा वर्षाच्या मुलीचा असल्याचे निष्पन्न झाले.
डॉ. प्रकाश पोळ यांनी याबाबत अहवाल पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा बदलून घेतला. परंतु अद्यापही संबंधित मुलीची ओळख पोलिसांनी पटली नाही. ४८ तासांपेक्षा जास्त वेळ संबंधित मुलगी नदीमध्ये असल्यामुळे तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नदीकाठच्या गावातील कोणी बेपत्ता मुलगी झाली आहे का, याचा पोलिस शोध घेत आहेत.