कालव्यात बालिकेचा छिन्नविच्छिन्न मृतदेह
By Admin | Updated: December 21, 2014 00:37 IST2014-12-21T00:33:19+5:302014-12-21T00:37:03+5:30
खंडाळा तालुक्यातील घटना : मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू

कालव्यात बालिकेचा छिन्नविच्छिन्न मृतदेह
लोणंद / शिरवळ : वाठार कॉलनी, ता. खंडाळा येथे वीर धरणाच्या नीरा उजवा कालव्यात सहा वर्षीय बालिकेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.
याबाबतची अधिक माहिती अशी की, लोणंदवरून वीरमार्गे सासवडला जाणाऱ्या रस्त्यावर नीरा नदीच्या पुलापासून पूर्वेकडील बाजूस वीर धरणाचा नीरा उजवा कालवा जातो.
याच कालवा परिसरात सहा वर्षीय बालिकेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याची कल्पना स्थानिक ग्रामस्थांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली. यानंतर लोणंद पोलीस ठाण्यातील कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. येथे आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले.
ट्रॅक्टर तसेच बॅटरीच्या प्रकाशात बालिकेचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. मात्र, थंडीचा कडाका आणि अंधार असल्यामुळे तसेच कालव्यात पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या.
दरम्यान, हा मृतदेह येथे कोणी टाकला, याचा शोध पोलीस घेत आहेत. बालिकेच्या अंगावर गुलाबी रंगाचे कपडे आहेत. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपअधीक्षक राहुल मकणीकर, पोलीस निरीक्षक अशोक शेळके, लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे दाखल झाले. (प्रतिनिधी)