थेंबाथेंबाने ‘श्रीमंत’ होतायत ब्लड बँका !

By Admin | Updated: March 17, 2016 23:39 IST2016-03-17T22:10:03+5:302016-03-17T23:39:06+5:30

वर्षभरात हजारोंचे रक्तदान : शासकीय, अशासकीय पेढ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात रक्त संकलन; अनेकांना मिळतंय जीवदान

Blood bank with a 'rich' drop! | थेंबाथेंबाने ‘श्रीमंत’ होतायत ब्लड बँका !

थेंबाथेंबाने ‘श्रीमंत’ होतायत ब्लड बँका !

संजय पाटील -- कऱ्हाड -आर्थिक बँका पैसा घेतात आणि गरजवंताला पैसाच पुरवितात; पण ‘ब्लड बँके’मध्ये दात्याकडून ब्लड संकलित करून गरजवंताला ‘जीवदान’ देण्याचे काम केले जाते. काही वर्षांपूर्वी रक्तदानाला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याने या बँकांमध्येही रक्ताचा तुटवडा जाणवायचा; मात्र सध्या रक्तदात्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या बँकाही ‘श्रीमंत’ होतायत. कऱ्हाडच्या एका शासकीय रक्तपेढीत वर्षभरामध्ये हजारोहून अधिक जणांनी रक्तदान केले असून, त्या रक्ताच्या पिशवीमुळे अनेकांना जीवदान मिळाले आहे, हे विशेष.
महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच या महागाईचा फटका रुग्णांनाही बसत आहे. शासकीय व अशासकीय रक्तपेढ्यांमधून दिले जाणारे रक्त काही महिन्यांपासून महागले आहे. प्रक्रिया खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ झाली असून, त्याबाबतचे अध्यादेश सर्वच रक्तपेढ्यांना देण्यात आले आहेत. अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती, डेंग्यू, सर्पदंश, मलेरिया, लेप्टोस्पायरा, कॅन्सर यासह अन्य रुग्णांना रक्ताची नितांत गरज असते. ही गरज भागविण्यासाठी ठिकठिकाणी शासकीय व अशासकीय रक्तपेढ्या कार्यरत आहेत. या रक्तपेढ्यांमध्ये विविध गटांचे रक्त उपलब्ध असते; मात्र ते घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात. यापूर्वी शासकीय पेढीमधून ‘व्होल ब्लड’ची पिशवी ४५० रुपयांना दिली जात होती तर अशासकीय पेढ्यांमध्ये तिची किंमत ८५० रुपये एवढी होती. मात्र, दरवाढीनंतर या पिशवीसाठी शासकीय पेढीत १ हजार ५० व अशासकीय पेढीमध्ये १ हजार ४५० रुपये मोजावे लागतायत. तसेच अशासकीय पेढ्यांमध्ये मिळणाऱ्या ‘पॅक्ड रेड सेल्स’, ‘प्लाझ्मा’, ‘प्लेटमेट’, ‘क्रायो’च्या पिशव्यांसाठीही जादा पैसे द्यावे लागत आहेत.
यापूर्वी आकारण्यात येणारे दर २००८ मध्ये ठरविण्यात आले होते. मात्र, त्याबाबतचा अध्यादेश २०१२ मध्ये अशासकीय पेढ्यांना देण्यात आला. त्यामुळे २००८ ते २०१२ पर्यंत पेढ्यांमधून रक्ताच्या पिशवीसाठी सरासरी दराची आकारणी करण्यात येत होती. २०१२ मध्ये अध्यादेश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार दर आकारणी होऊ लागली. अशासकीय रक्तपेढ्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालविल्या जातात; मात्र २००८ मध्ये ठरविण्यात आलेला दर परवडणारा नसल्यामुळे अशासकीय रक्त पेढ्या चालकांनी एकत्रित येऊन याबाबत नागपूर न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. रक्ताचे दर ठरविण्यासाठी न्यायालयाने एक समिती नेमल्यानंतर संबंधित समितीने रक्ताच्या पिशवीची किमान किंमत १ हजार ३०० रुपये करण्याची शिफारस राज्य शासनाला केली. राज्य शासनाने हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविला. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने सुधारित सेवाशुल्काला मान्यता दिल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने त्याबाबतचे नवे परिपत्रक सर्व शासकीय व अशासकीय रक्तपेढ्यांना पाठविले. त्यामुळे गत काही महिन्यांपासून रक्ताचे दर वाढले आहेत.
एकीकडे रक्ताचे दर वाढले असताना दुसरीकडे रक्तदात्यांची संख्याही वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. वेगवेगळ्या कारणास्तव आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांमधून शेकडोजण रक्तदान करीत आहेत. काहीजण शासकीय किंवा अशासकीय पेढीमध्ये जाऊन रक्तदान करीत असल्याचे दिसते.


संकलित रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या...
रक्तपेढ्यांमध्ये दान केलेल्या रक्ताचा गट पेढीकडून निश्चित केला जातो. त्यानंतर रक्ताच्या एचआयव्ही, कावीळ यासह अन्य आजारांच्या चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांनंतर रक्त रक्तपेढ्यांमधून वेगळं केलं जातं. काहीवेळा रक्तातील विविध घटक वेगळे केले जातात. फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा, पॅकलेस ब्लड, सिरम आदी घटक यावेळी वेगवेगळे केले जातात. त्यामुळे अधिक रुग्णांना रक्ताचा लाभ मिळतो.

का झालंय रक्त महाग?
प्रक्रिया खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ झाल्याचे रक्तपेढी चालकांकडून सांगण्यात येते. एखाद्याने रक्तदान केल्यानंतर त्या रक्ताची तपासणी करून प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पिशवीची किंमत साधारणपणे ४५० रुपये आहे. तसेच तपासणी किटची किंमत २५० रुपयांपर्यंत आहे. वीजबिल, कर्मचाऱ्यांचे पगार व यंत्रसामूग्रीची देखभाल, दुरुस्तीसाठी येणारा खर्चही जास्त आहे. त्यामुळे जुन्या दरातून रक्तपेढी चालविणे अशक्य होते. प्रक्रिया खर्च वाढल्यामुळेच रक्ताच्या पिशवीचे दर वाढले आहेत, असे अशासकीय रक्तपेढी चालक सांगतात.

का झालंय रक्त महाग?
प्रक्रिया खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ झाल्याचे रक्तपेढी चालकांकडून सांगण्यात येते. एखाद्याने रक्तदान केल्यानंतर त्या रक्ताची तपासणी करून प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पिशवीची किंमत साधारणपणे ४५० रुपये आहे. तसेच तपासणी किटची किंमत २५० रुपयांपर्यंत आहे. वीजबिल, कर्मचाऱ्यांचे पगार व यंत्रसामूग्रीची देखभाल, दुरुस्तीसाठी येणारा खर्चही जास्त आहे. त्यामुळे जुन्या दरातून रक्तपेढी चालविणे अशक्य होते. प्रक्रिया खर्च वाढल्यामुळेच रक्ताच्या पिशवीचे दर वाढले आहेत, असे अशासकीय रक्तपेढी चालक सांगतात.



कऱ्हाडला
१ हजार ३६ जणांचे रक्तदान
कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये २०१५ मध्ये ८३७ जणांनी स्वेच्छा रक्तदान केले आहे. तर यावर्षी फेब्रुवारीअखेर १९९ जणांनी रक्तदान केले आहे. रक्तदात्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी उपजिल्हा रुग्णालयाकडून विविध उपक्रम राबविले जातात. तसेच कार्यक्रमानिमित्त इतर उपक्रम राबविण्याऐवजी रक्तदान शिबिर घेण्यात यावे, असे आवाहनही रुग्णालयाकडून करण्यात येते. या आवाहनालाही मोठा प्रतिसाद मिळत असून, शिबिरांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात रक्त संकलित केले जात आहे.

Web Title: Blood bank with a 'rich' drop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.