आंधळीचा ठकसेन महेश माने गजाआड
By Admin | Updated: January 18, 2015 00:21 IST2015-01-18T00:20:22+5:302015-01-18T00:21:25+5:30
सातारच्या अकराजणांना गंडा : पोलीस, वनखात्यात नोकरी लावण्याचे आश्वासन

आंधळीचा ठकसेन महेश माने गजाआड
सातारा : शासकीय सेवेत नोकरी लावतो म्हणून सातारा तालुक्यातील अकरा युवकांची फसवणूक करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील आंधळी येथील महेश नानासाहेब माने या युवकास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्याने संबंधित युवकांची ४.१0 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी गणेश रघुनाथ जानकर (वय २३, रा. माचीपेठ, समर्थ मंदीर, सातारा) याने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश नानासाहेब माने (रा. आंधळी, ता. पलूस, जि. सांगली) याने आॅगस्ट २0१४ ते आॅक्टोबर २0१४ या कालावधीत सातारा तालुक्यातील अमोल पवार, मंगेश भांडळकर, रोहित सावंत, सुनील मेळाट, अमित धोत्रे, सोमनाथ बोभाटे, सुरज कोळी, सुधीर मुळे, अजित देशमुख, ओंकार मालुसरे, सागर गुजर या युवकांची अनेकदा भेट घेतली. या भेटीत त्याने आपली राजकीय मंडळींशी ओळख असून मी तुम्हाला आरोग्य विभाग, महसूल खाते, पोलीस त्याचबरोबर वनखात्यात नोकरी लावतो, असे सांगितले. यावेळी त्याने प्रत्येकाला आपला मोबाईल नंबरही दिला आणि या युवकांचेही नंबर घेतले. यानंतर तो प्रत्येकाशी वारंवार संपर्क साधून काम होणार असे आश्वासन देत होता. काही दिवसानंतर तो सातारा येथे आला आणि या युवकांकडून पैसे घेतले. तिघांकडून त्याने प्रत्येकी ५0 हजार घेतले तर उर्वरित युवकांकडून २0 हजार, १५ हजार, १0 हजार अशी रक्कम घेतली.
दरम्यानच्या काळात सांगली जिल्ह्यात शासकीय सेवेतील भरती झाली मात्र, या भरतीत या युवकांचा समावेश झाला नाही. यामुळे या युवकांनी त्याच्याशी संपर्क साधला त्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली. अनेकदा तर तो मोबाईलही उचलत नव्हता. यामुळे संबंधित युवकाच्यावतीने गणेश रघुनाथ जानकर याने शाहुपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार एस. जी. देशमाने करत आहेत. (प्रतिनिधी)
पहिल्या भेटीत ओळख अन् दुसऱ्या भेटीत पैसे
महेश नानासाहेब माने याने साताऱ्यात येऊन संबंधित अकरा युवकांच्या दोनवेळा भेटी घेतल्या. पहिल्याच भेटीत या युवकांना भुरळ पाडली. आपल्या ओळखी कुठे आहेत आणि कोणाकोणाला नोकरीला लावले याची माहिती त्याने युवकांना दिली. दुसऱ्या भेटीत मात्र, त्याने प्रत्येकाकडून काही रक्कम घेतली आणि आता आपण आॅर्डर घेऊनच भेटू असे सांगितले. महेशने पहिल्या भेटीत प्रत्येकाची ओळख करून घेतली आणि दुसऱ्या भेटीत त्याने प्रत्येकाकडून पैसे घेतले.