आठही मतदारसंघांत भाजपाची तयारी
By Admin | Updated: August 22, 2014 22:06 IST2014-08-22T21:37:27+5:302014-08-22T22:06:56+5:30
भाजपने २८८ जागांवर लढण्याची तयारी

आठही मतदारसंघांत भाजपाची तयारी
कऱ्हाड : जागावाटपावरून महायुतीत सुसंवाद नसल्याच्या बातम्या येत असतानाच भाजपने २८८ जागांवर लढण्याची तयारी सुरू केली आहे़ गुरुवारी पुणे येथे झालेल्या पक्षाच्या मंडल प्रमुखांच्या बैठकीत संघटनमंत्री व्ही़ सतीश यांनीही तसे संकेत दिल्याचे खात्रीशीर समजते. त्यामुळे सातारा जिल्ह्यात आठही मतदारसंघांत भाजप तयारीला लागल्याचे दिसते़
भाजप, शिवसेना, आरपीआय़, स्वाभिमानी, रासप़, शिवसंग्राम अशी महायुती राज्यात लोकसभा निवडणुकीला आकाराला आली़ या महायुतीने चांगले यशही मिळविले़ त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुती कायम राहील, अशी खात्री वाटते़ मात्र, गेल्या महिनाभरातील राजकीय घडामोडी पाहता, महायुतीत सर्व काही आलबेल आहे, असे म्हणता येत नाही़ निवडणुकीपूर्वीच भाजप-सेनेतील अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे़ दोघांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा वादाला कारणीभूत मानल्या जातात. त्यातच खासदार राजू शेट्टीही ‘मनसेबरोबर युती करू,’ असा इशारा देताना दिसतात़ तसेच भाजप-सेनेच्या नेत्यांच्यात सुसंवाद नसल्याची जाहीर कबुलीही ते देतात, ही वस्तुस्थिती आहे़
२८८ जागांत वाटेकरी वाढल्याने दोन्ही प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे़ तर मोदी लाटेमुळे भाजप-सेनेच्या वाटेवर असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे़ या सगळ्यात नेत्यांना कसरत करताना दमछाक होत असल्याचे पुण्याच्या बैठकीत नेत्यांनी सांगितल्याचे समजते. याच वेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १८ जागांची विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती निवडण्याचे संकेत दिले़ त्यामुळे भाजपने २८८ जागांची तयारी सुरू केल्याच्या वृत्ताला पुष्टीच मिळत आहे. (प्रतिनिधी)