‘बॉडीबिल्डिंग’च्या निमित्तानं भाजपचं ‘शक्तिप्रदर्शन’

By Admin | Updated: April 10, 2015 23:46 IST2015-04-10T22:50:16+5:302015-04-10T23:46:13+5:30

उद्या स्पर्धा : अनेक मंत्र्यांची शहरात प्रथमच हजेरी

BJP's 'power demonstration' on 'Bodybuilding' | ‘बॉडीबिल्डिंग’च्या निमित्तानं भाजपचं ‘शक्तिप्रदर्शन’

‘बॉडीबिल्डिंग’च्या निमित्तानं भाजपचं ‘शक्तिप्रदर्शन’

सातारा : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून ‘लाल दिवा’ बघण्याची सवय मोडलेल्या सातारकरांसाठी रविवारचा दिवस कदाचित पुन्हा वेगळा ठरणार आहे. अखिल भारतीय पातळीवरच्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्तानं भाजप, सेना सरकारमधील अनेक मंत्र्यांची फौज सातारा शहरात अवतरणार आहे. अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बॉडीबिल्डिंग’च्या निमित्ताने भाजपचं ‘शक्तिप्रदर्शन’ पाहायला मिळणार आहे.रविवार, दि. १२ रोजी तालीम संघाच्या मैदानावर या स्पर्धा होणार असून, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री विजय शिवतारे, बांधकाम राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, राज्य साखर परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील भाजप-सेनेचे अनेक आमदार या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहेत. इंडियन बॉडीबिल्डिंग अ‍ॅन्ड फिटनेस फेडरेशन व छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत गोपीनाथ मुंढे यांच्या स्मरणार्थ ५५ वी राष्ट्रीय शरीरसौष्ठव ‘भारत श्री’ व दहावी ‘मिस भारत श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नियोजन केले आहे.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून सातारा जिल्ह्यात मंत्र्यांचे दौरे जवळपास बंदच झाले होते. शंभूराज देसाई वगळता काँग्रेस अन् राष्ट्रवादीचे आमदार निवडून देणाऱ्या सातारा जिल्ह्यात लाल दिव्याचे दर्शन दुर्मिळ झाले होते. सत्ता आल्यापासून प्रथमच एवढे सारे मंत्री व लोकप्रतिनिधी सातारा शहरात प्रथमच येत आहेत. (प्रतिनिधी)

देशभरातील सुमारे सत्तावीस राज्यांतून सहाशे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून, त्यात दीडशे महिलाही भाग घेणार आहेत. या स्पर्धकांसाठी तब्बल तीन लाख अंडी व चार टन चिकन खाद्याची सोय करण्यात आलीय.
- रवींद्र पवार, संयोजक

Web Title: BJP's 'power demonstration' on 'Bodybuilding'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.