राष्ट्रवादीच्या गडात भाजपची कडवी झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:46 IST2021-02-17T04:46:48+5:302021-02-17T04:46:48+5:30
वाई : वाई तालुक्यातील राजकीय पटलावर शेंदूरजणे गणामध्ये राजकीयदृष्ट्या महत्त्वाची व संवेदनशील असणाऱ्या लोहारे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे ...

राष्ट्रवादीच्या गडात भाजपची कडवी झुंज
वाई : वाई तालुक्यातील राजकीय पटलावर शेंदूरजणे गणामध्ये राजकीयदृष्ट्या महत्त्वाची व संवेदनशील असणाऱ्या लोहारे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे युवा नेते दत्तात्रय ढेकाणे व वैभव सावंत यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सत्ता असणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रवादी विचारांच्या पॅनल प्रमुखांना विचार मंथन करायला लावणारी कडवी झुंज दिली.
सत्ताधारी गटातील नेत्यांना लोहारे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक व सरपंच, उपसरपंच निवडीमध्ये निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले आहे. भाजपचे दत्तात्रय ढेकाणे व वैभव सावंत यांनी लोहारे ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या माध्यमातून येथील निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केल्यामुळे तालुक्यातील व शेंदूरजणे गणातील सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले होते. ढेकाणे व सावंत यांनी लोहारेमधील बाजार समितीचे माजी सभापती मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पॅनलच्या सत्ताधाऱ्यांना शेवटच्या क्षणापर्यंत दिलेली कडवी झुंज आगामी काळात होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेंदूरजणे गणातील राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांना डोकेदुखी ठरणार असल्याचे संकेत दिल्याने विचार करायला भाग पाडणार असल्याचे बोलले जात आहे.
लोहारे ग्रामपंचायतीमध्ये सात जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप प्रणित भैरवनाथ पॅनलने ३ जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादी गटाच्या पॅनल प्रमुखांना जास्तीच्या अवघ्या एका जागेमुळे निसटता विजय मिळवता आला. भैरवनाथ पॅनलच्या मंगल सावंत, नंदा शेलार, प्रशांत गुरव यांनी विजयश्री खेचून आणली. भैरवनाथ पॅनलच्या विजयी उमेदवारांचे खासदार उदयनराजे भोसले, माजी आमदार मदन भोसले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, संचालक रतन शिंदे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, युवा नेते विकास शिंदे, पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे, भाजप तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, वाईचे नगरसेवक सतीश वैराट यांनी कौतुक केले.