Satara: रामराजेंचा उठाव; रणजितसिंह खिंडीत; माढ्यात महायुतीतील खदखद बाहेर 

By नितीन काळेल | Published: March 18, 2024 07:26 PM2024-03-18T19:26:55+5:302024-03-18T19:27:23+5:30

मोहिते, राजे गट आघाडीबरोबर जाणार?, भाजप लक्ष ठेवून

BJP fielded Ranjit Singh for Lok Sabha After Naik Nimbalkar was nominated, there was displeasure in the mahayuti, Ramraje Naik-Nimbalkar challenged | Satara: रामराजेंचा उठाव; रणजितसिंह खिंडीत; माढ्यात महायुतीतील खदखद बाहेर 

Satara: रामराजेंचा उठाव; रणजितसिंह खिंडीत; माढ्यात महायुतीतील खदखद बाहेर 

सातारा : भाजपने माढ्यासाठी खासदार रणजितसिंहवर विश्वास दाखवल्यानंतर महायुतीतील खदखद बाहेर पडली असून रामराजेंनी उठावच केला आहे. यासाठी मोहिते-पाटील यांचीही भेट घेतली. त्यामुळे मोहिते अन फलटणचा राजे गट आघाडीत जाऊन उमेदवारी घेण्याबाबत हालचाली वाढल्या असल्यातरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळीच लक्ष घातल्याने या उठावाला कोणते वळण मिळते हे पहावे लागणार आहे.

माढा लोकसभेचा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आल्यापासून चर्चेत राहिला आहे. पण, यावेळची चर्चा ही राजकारणातील मोठी उलथापालथ आणि नवीन समीकरणे जुळवणारी ठरु पाहत आहे. कारण, महायुतीत राष्ट्रवादीचा अजित पवार गट आल्यापासून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मतदारसंघावर दावा केलेला. खासदार रणजितसिंह यांना उभे आव्हान दिलेले.

त्यातच अकलुजचे मोहिते-पाटील आणि खासदारांतही दरी वाढलेली. त्यामुळे भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते यांनाही माढ्यावर स्वारी करायची होती. यासाठी पुन्हा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमदेवारी मिळू द्यायची नाही याकरिता रामराजेंप्रमाणेच मोहितेही तयारीत होते. पण, विरोधानंतरही भाजपने रणजितसिंह यांना उमेदवारी देण्याचा डाव खेळला. त्यामुळे रामराजेंनी उठाव केला. तर मोहिते-पाटील यांच्याकडूनही याला साथ मिळत गेली. यातूनच बऱ्याच घडामोडी घडल्या.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते, रामराजे, शेकापचे आमदार जयंत पाटील, सांगोल्याचे शेकापचे डाॅ. अनिकेत देशमुख, करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप, नारायण पाटील एकत्र आले. त्यातून राजकीय घडामोडी वाढत गेल्या. सर्वांचा विरोध हा खासदार रणजितसिंह यांना असल्याचे दिसून आले. त्यामुळे माढ्यात राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत निर्माण झाले आहेत. यातून महाविकास आघाडीचा पर्याय पुढे आला आहे.

माढ्याच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने अनेक पर्याय तपासलेत. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना बरोबर घेण्याचाही प्रयत्न झाला. पण, याबाबत ठोस काही जमूनच आले नाही. अशातच मोहिते आणि रामराजे यांच्यावरही निवडणूक लढविण्याबाबत कार्यकर्त्यांचाही दबाव वाढला आहे. यात शेकापनेही उडी घेऊन ताकद देण्याचे काम केले आहे. यामुळे दोघेही महाविकास आघाडीतून संजीवराजे किंवा धैर्यशील मोहिते यांच्यापैकी एकाला उमेदवारी घेण्याच्या भूमिकेत असल्याची माहिती समोर येत आहे. हे नवीन समीकरण उदयास आले तर भाजपसमोर आव्हान उभे राहणार आहे. यामुळे भाजप खासदार रणजितसिंहच्या उमेदवारीबद्दल काय भूमिका घेणार का ? याकडेही राजकीय वर्तूळाचे लक्ष असणार आहे.

मोहितेंची नाराजी न परवडणारी; पण, आैटघटकेची ठरणार ?

सोलापूर जिल्ह्यातील मोहिते-पाटील एक मोठे राजकीय घराणे. या घराण्याची जिल्ह्याच्या राजकारणावर मांड होती. गेल्यावेळी माेहिते-पाटील यांनी रणजितसिंह यांना निवडूण आणण्यात मोठा वाटा उचललेला. आता तेच खासदारांच्या उमेदवारीवर नाराज आहेत. यामुळे भाजपसमोर आव्हान उभे राहिले आहे. तरीही मंत्री गिरीश महाजन यांनी मोहिते-पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय. तर आतापर्यंत मोहिते यांच्या संस्थांना भाजपकडून अनेकप्रकारे मदत झालेली आहे. वेळोवेळी ताकद देण्यात येत आहे. त्यामुळे ते चुकीच्या दिशेने पाऊल टाकतील, असे संभव नाही. तसेच भाजपच्या वरिष्ठांकडून त्यांची नाराजी दूर होऊ शकते. या कारणाने मोहिते-पाटील यांची आताची ही भूमिका आैटघटकेची ठरु शकते, असा कयासही बांधला जात आहे.

खासदार गाठीभेटीत; मोहितेंच्या विराेधकांबरोबर..

उमेदवारीला विरोध होत असतानाही दुसरीकडे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्याबरोबर मतदारसंघात गाठीभेटी वाढवल्या आहेत. मोहिते-पाटील यांचे विराेधक माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याबरोबर भेट घेत निवडणुकीबाबत व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. पण, सध्याचा विरोध निवडणुकीत उतरल्यास त्यांच्यासाठी माढा सोपा नाही हेही स्पष्ट आहे.

Web Title: BJP fielded Ranjit Singh for Lok Sabha After Naik Nimbalkar was nominated, there was displeasure in the mahayuti, Ramraje Naik-Nimbalkar challenged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.