‘इंद्रधनुष्य’ स्पर्धेत पक्षी, फुलपाखरे बागडली...
By Admin | Updated: January 19, 2015 00:25 IST2015-01-18T22:30:10+5:302015-01-19T00:25:16+5:30
सातारा : स्पर्धेत २२०० विद्यार्थ्यांचा सहभाग

‘इंद्रधनुष्य’ स्पर्धेत पक्षी, फुलपाखरे बागडली...
सातारा : कडाक्याची थंडी... धुक्यात हरवलेली सकाळ... सभोवताली उंचच उंच डोंगर असणाऱ्या येथील भैरोबाच्या डोंगराच्या पायथ्याशी सकाळी सातपासून चिमुकल्यांची वर्दळ सुरू झाली. प्रचंड उत्साहात हे चिमुकले रंगांच्या चित्रांच्या दुनियेत हरवून गेले. कोणी फुगेवाला रेखाटला तर कुणी जोकर, फुलदाणी, आवडता पक्षी, बागडणारी फुलपाखरे तर पाण्यात नाव सोडणारी स्वच्छंदी मुले, काहीजणांनी कागदावर अक्षरश: जिवंत केली. निमित्त होते. ‘रोटरॅक्ट क्लब आॅफ सातारा कॅम्प’ आयोजित ‘इंद्रधनुष्य २०१५’ या भव्य चित्रकला स्पर्धेचे. सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेत प्ले-ग्रुप पासून ६ वी पर्यंतच्या २२३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमासाठी रोटरीचे प्रांतपाल रो. व्यंकटेश मेतन, सेक्रेटरी रो. श्रीराम कुलकर्णी, दिग्दर्शक समृद्धी जाधव, शिल्पकार विकास सावंत, कला महाविद्यालयाचे प्राचार्य विजय धुमाळ, चित्रकार क्षीरसागर, अमोल वाघमोडे, विजय पाटील, संतोष शेडगे, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष रोटरॅक्टर नरेंद्र शेलार, प्रकल्प प्रमुख रोटरॅक्टर सतीश डोके, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. सुहास शहाणे, रो. संदीप सुतार हे उपस्थित होते.या स्पर्धेसाठी आनंदबन शाळेचा शिक्षक वर्ग, कर्मनिष्ठा सामाजिक संस्था यांचे सहकार्य मिळाले.
या स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन २६ जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे. बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी पाच ते रात्री आठपर्यंत येथील शाहू कला मंदिर या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष रोटरॅक्टर नरेंद्र शेलार यांनी केले. (प्रतिनिधी)