प्रकल्पांचे ‘‘पांढरे हत्ती’’ पोसताना कोट्यवधींचा तोटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST2021-09-11T04:41:25+5:302021-09-11T04:41:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : किसन वीर कारखान्यांमध्ये सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी रुपये कर्ज काढून बाय प्रॉडक्टचे मोठमोठे प्रकल्प उभारले. मात्र, ...

Billions lost while feeding "white elephants" to projects! | प्रकल्पांचे ‘‘पांढरे हत्ती’’ पोसताना कोट्यवधींचा तोटा!

प्रकल्पांचे ‘‘पांढरे हत्ती’’ पोसताना कोट्यवधींचा तोटा!

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : किसन वीर कारखान्यांमध्ये सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी रुपये कर्ज काढून बाय प्रॉडक्टचे मोठमोठे प्रकल्प उभारले. मात्र, हे प्रकल्पच पूर्ण क्षमतेने चालवले गेले नसल्याने ते पांढरे हत्ती ठरले आहेत. हे हत्ती पोसत असताना कारखान्याला कोट्यवधी रुपयांचा तोटा सोसावा लागला आहे.

किसन वीर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने बावीस मेगावॅटचा को-जनरेशन प्रकल्प उभारला, तीन डिस्टिलरी उभारल्या. हे प्रकल्प उभारण्यासाठी बँकांकडून कर्ज काढलेले आहेत. मात्र, हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविले गेले नसल्याने या प्रकल्पांमधून कारखान्याला फायदा मिळण्याऐवजी तोटा सोसावा लागतो आहे.

दरम्यान, २००३ पासून हा कारखाना माजी आमदार मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली आहे. २००३ पासून आजअखेर हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालवला गेला नाही. त्यामुळे अपेक्षित साखर उत्पादन झालेले नाही. या कारखान्याची गाळप क्षमता चार हजार मेट्रिक टन आहे. इतर साखर कारखाने क्षमतेपेक्षा पुढे जाऊन साखर निर्मिती करण्यात आघाडीवर असले तरी किसन वीर कारखान्याने मात्र पूर्ण क्षमतेने ऊस गाळप केले नसल्याचे पुढे आले आहे. चार हजार मेट्रिक टन क्षमता असलेला कुठलाही कारखाना सहा महिने सुरू राहिला तरी साडेसात लाख ते आठ लाख क्विंटल साखर निर्मिती करतो. मात्र, किसन वीर कारखान्यामध्ये उसाचे क्रशिंग क्षमतेपेक्षा कमी झाल्याने साडेपाच ते सहा लाख क्विंटल साखरनिर्मिती एका हंगामात केली जाते. या कारखान्याने क्षमतेप्रमाणे उसाचे गाळप न केल्याने दीड लाख क्विंटल साखर कमी तयार होते. कामगारांचे पगार मशिनरीचा खर्च तेवढाच मात्र उत्पादन कमी अशी स्थिती आहे.

कारखान्याकडील कोजन प्रकल्प व डिस्टिलरी प्रकल्प हे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत असताना ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाहीत, त्यामुळे या प्रकल्पाकडून अपेक्षित उत्पन्न कारखान्याला प्राप्त झालेले नाही, त्यामुळे कारखान्याच्या आर्थिक पत्रकावर परिणाम झाला आहे. २२ मेगावॅट प्रकल्पातून केवळ १७ मेगावॅटपर्यंतच वीजनिर्मिती केली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

किसन वीर साखर कारखाना कोजन प्रकल्प २२ मेगावॅट क्षमतेचा असून, निर्यात क्षमता १४.४ मेगावॅट आहे. सन २०१८/१९, २०१९/२०, २०२०/२१ या आर्थिक वर्षांत या प्रकल्पातून वीज उत्पादन कारखाना वापर व निर्यात वीज युनिट पाहता डीपीआरप्रमाणे प्रकल्प क्षमतेचा वापर होत नाही. अपेक्षित ऊस गाळप न झाल्यामुळे वरील सर्व पदार्थ व कोजन प्रकल्पावर परिणाम होत आहे.

कारखान्याची देणी व भांडवल यांचे प्रमाण १:३ असावे. मात्र, कारखान्यांचे स्वभांडवल अत्यंत कमी असून, कारखान्याच्या आर्थिक अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. तसेच कारखान्याच्या व्यवस्थापनाने आणि अनावश्यक खर्चात मोठी कपात करणे आवश्यक आहे. कारखान्याने हाती घेतलेले विविध प्रकल्प भागीदारी तत्त्वावरील साखर कारखान्यामुळे किसन वीर ससाकाची कर्जे व देणी मोठ्या प्रमाणात वाढली. कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून त्यांचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालून कर्ज व देणी कमी करण्यासाठी योग्य असे प्रशासकीय व आर्थिक नियोजन होणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने व्यवस्थापक मंडळाचे प्रयत्न कमी पडले आहेत.

भागीदारीतील सर्वच कारखान्यांचे नक्त मूल्य उणे

कारखान्याचे सन २०१९/२० च्या आर्थिक परिपत्रकांवरील नोंदीनुसार किसन वीर सातारा ससाकाचे नक्त मूल्य उणे ५०५५.८५, लाख, किसन वीर प्रतापगड भागीदारी युनिटचे नक्त मूल्य उणे ५९९४.७५ लाख तर किसन वीर खंडाळा भागीदारी युनिटचे नक्त मूल्य उणे १३८२.३१ लाख झालेले आहे, ही बाब कारखान्याच्या हलाखीची आर्थिक परिस्थिती व अयोग्य नियोजनाचे द्योतक आहे, असा निष्कर्ष लेखापरीक्षकांनी काढलेला आहे.

कडू साखर

भाग ३

Web Title: Billions lost while feeding "white elephants" to projects!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.