भोंदू दाम्पत्याला साताऱ्यात अटक;
By Admin | Updated: July 8, 2015 00:41 IST2015-07-08T00:29:37+5:302015-07-08T00:41:26+5:30
मुलगा होण्यासाठी लाटले २८ हजार

भोंदू दाम्पत्याला साताऱ्यात अटक;
सातारा : ‘हमखास मुलगा देतो,’ असा दावा करून येथील एका दाम्पत्याने अंगात देवाचे वारे आणून, विविध तोडगे आणि औषधे देऊन विवाहितेकडून पैसे आणि दागिन्यांच्या रूपात २८ हजारांचा ऐवज लाटल्याप्रकरणी या दाम्पत्याला मंगळवारी अटक करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
विठ्ठल नारायण वायदंडे आणि नंदा विठ्ठल वायदंडे (रा. गणेश चौक, कोडोली) असे अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. मुलगा होण्यासाठी आपल्याकडून या दोघांनी वेळोवेळी एकूण १२ हजार रुपये घेतले, तसेच कानातील १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेलही जबरदस्तीने काढून घेतले, अशी फिर्याद सारिका राकेश मोहिते (रा. गणेश चौक, मोहिते चाळ) या महिलेने शहर पोलिसांत दिली आहे. या फसवणुकीत आपली जाऊ शुभांगी प्रशांत मोहिते (रा. जिहे-कटापूर) हिने देवऋषी दाम्पत्याला मदत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीनुसार, सारिका मोहिते यांना दोन मुली असून, त्यांना मुलगा होण्यासाठी या दाम्पत्याने अंगात देवाचे वारे आल्याचे दाखवून वेळोवेळी रक्कम घेतली, तसेच कानातील वेल जबरदस्तीने घेतले. त्यामुळे या दाम्पत्यावर फसवणूक, जबरी चोरी आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, निष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘अंनिस’चे प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, शंकर कणसे, श्रीनिवास जांभळे, सीताराम चाळके, युवराज घाडगे, सुनील रणदिवे, शालन वाघमारे तसेच गुन्हे शाखेचे पोलीस नाईक आनंदराव भोईटे, मोहन नाचण, संजय जाधव, महेश शिंदे, वैशाली घाडगे, ज्योती गोळे यांनी कारवाईत भाग घेतला.
दाम्पत्यावर अचानक कारवाई
‘अंनिस’कडे तक्रार झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सल्ल्यानुसार दाम्पत्याच्या अटकेसाठी तयारी केली. गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनानुसार महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास विठ्ठल आणि नंदा वायदंडे यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. अचानक झालेल्या या कारवाईने आरोपी गोंधळले. (आणखी वृत्त पान ३)