प्रचाराचं भुईचक्र... अफवांच्या केपा!

By Admin | Updated: October 20, 2014 22:36 IST2014-10-20T21:44:31+5:302014-10-20T22:36:43+5:30

‘नेटवर्क’ जिंकलं : शक्तिप्रदर्शने आणि वावड्यांनी बदलला नाही निकाल

Bhaychichrao campaign ... Kappa rumors! | प्रचाराचं भुईचक्र... अफवांच्या केपा!

प्रचाराचं भुईचक्र... अफवांच्या केपा!

संजीव वरे - वाई -जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेली वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील लढत प्रथम एकहाती वाटत असतानाच काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची दमछाक केली. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठ्या असणाऱ्या मतदारसंघात प्रचाराची भुईचक्रं गरगरली, तसंच मतदानापूर्वी आणि नंतर अफवा आणि वावड्यांच्या केपाही वाजल्या. मात्र ‘चोवीस तास नेटवर्क’ने आमदार मकरंद पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवून दिला.


निवडणूक जाहीर झाल्याबरोबर दोन्ही काँग्रेसनी पूर्वी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आमदारांना पक्षात जाहीर प्रवेश दिला. वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातून मकरंद पाटील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार ठरले. राज्यात युती आणि आघाडी तुटण्यापूर्वी मकरंद पाटील यांच्यासमोर प्रबळ उमेदवार कोण, अशी चर्चा सुरू होती. काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच वाईतून लढण्याचे आवाहन केले. माजी आमदार मदन भोसले यांनी निवडणूक लढण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करून मदन भोसले यांनी भाजपतर्फे निवडणुकीस सामोरे जावे, काँग्रेसकडून लढू नये, असा आग्रह धरला. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते, मंत्री किसन वीर कारखान्यावर येऊन गेले होते. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मदन भोसले यांना विधिमंडळात संधी देण्याची मागणी केली होती; परंतु काँग्रेसने त्याची दखल घेतली नाही, याचा राग या आग्रहामागे होता. अर्ज भरण्याची तारीख जवळ येईपर्यंत मदन भोसलेंच्या निर्णयाबद्दल संभ्रम राहिला आणि ऐन वेळी ते काँग्रेसकडून आखाड्यात उतरले. फॉर्म भरल्याचेही त्यांनी जाहीर सभेतच जाहीर केले. यानंतर प्रचारसभा, पदयात्रा, शक्तिप्रदर्शन यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने सहभाग घेतला. शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसमोर मोठे आव्हान उभे केले. निकाल कुणीच छातीठोकपणे सांगू शकणार नाही, असे वातावरण निर्माण केले. राष्ट्रवादीतर्फे उमेदवारीची खात्री असल्याने मकरंद पाटील यांनी खूप आधीपासून मतदारसंघ ढवळून काढायला सुरुवात केली होती. तीन तालुक्यांतील नगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादीचे पदाधिकारी अशी मोठी फौज त्यांच्याकडे होती. योग्य नियोजन आणि नेमून दिलेले काम प्रत्येकाने चोख पार पाडणे या कार्यशैलीमुळे तीस-चाळीस हजारांचे मताधिक्य घेण्याची त्यांना खात्री होती. मतदारसंघातील तरुण, ज्येष्ठ, महिला यांच्याशी असलेल्या सततच्या संपर्कामुळेच मकरंद पाटील यांना मोठी आघाडी मिळाली.
कांदाटी खोऱ्यापासून लोणंद-खंडाळा, वाई-महाबळेश्वर अशा अवाढव्य आणि भौगोलिकदृष्ट्या मोठा फरक असलेल्या मतदारसंघातील मोठा जनसंपर्कच आमदार मकरंद पाटील यांना फलदायी ठरल्याचे दिसून
येते. (प्रतिनिधी)

उमेदवार वाढूनही मताधिक्य वाढले
मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना २१ हजार ८२५ मतांची आघाडी होती. यावेळी त्यात १६ हजार ८७७ मतांची वाढ झाली. मागील निवडणुकीत मदन भोसले यांना ६९ हजार ६२ मते मिळाली होती. यावेळी त्यांना ६२ हजार ५१६ मते मिळाली आहेत. भाजपाचे उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना खंडाळ््यातून चांगले मतदान झाले असले तरी त्यांची मते घटली आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांना ३५ हजार ४५२ मते मिळाली होती. यंदा त्यांना २५ हजार २५५ मतांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे डी. एम. बावळेकर यांना महाबळेश्वर तालुक्यात चांगली मते पडली असली तरी त्यांची एकूण मते फक्त २३ हजार ३४३ भरली. पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत मकरंद पाटीलच आघाडीवर राहिले.

Web Title: Bhaychichrao campaign ... Kappa rumors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.