‘भाऊ’ अन् ‘राजे’ सर्वाधिक श्रीमंत !
By Admin | Updated: September 30, 2014 00:06 IST2014-09-30T00:05:02+5:302014-09-30T00:06:12+5:30
वाढता वाढे संपत्ती : प्रतिज्ञापत्रातील आकडेवारी सांगते श्रीमंतीची कथा

‘भाऊ’ अन् ‘राजे’ सर्वाधिक श्रीमंत !
सातारा : कायमस्वरूपी दुष्काळी माण-खटावमध्ये श्रीमंतीचा मात्र सुकाळ आहे. विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या जिल्ह्यातील उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केलेले संपत्तीचे विवरण लक्षात घेता ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शेखर गोरे सर्वाधिक श्रीमंत असून, त्यांची संपत्ती २९.८७ कोटी इतकी आहे. त्यांच्या जवळपास श्रीमंतीमध्ये त्यांच्या जवळपास पोहोचणारे फक्त सातारा-जावळीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत. त्यांची संपत्ती २५.२२ कोटी इतकी आहे.
प्रत्येक उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. त्यांच्यावर असणाऱ्या कर्जाची आकडेवारीही त्यामध्ये दिली आहे. पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत झालेली वाढही लक्षणीय आहे.
माण-खटावचे शेखर गोरे यांची संपत्ती सर्वाधिक असून, ती २९ कोटी ८७ लाख ५७ हजार १७३ रुपये आहे. यामध्ये २७ कोटी ६१ लाख ७५ हजार ७४८ स्थावर तर २ कोटी २६ लाख ११ हजार ४२५ रुपये जंगम मालमत्ता आहे.
गतवर्षीच्या तुलनेत आमदार जयकुमार गोरे यांची संपत्ती दुप्पट आहे. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती १ कोटी ५३ लाख ७९ हजार ८५३ इतकी असल्याचे म्हटले होते. यावेळी मात्र, संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते. त्यांची स्थावर मालमत्ता १ कोटी ४० लाख १० हजार ९७० तर जंगम मालमत्ता २ कोटी १ लाख ९ हजार ७९५ अशी एकूण ३ कोटी ४१ लाख २० हजार ७६५ इतकी आहे. शिवसेनेकडून नशीब आजमावणारे रणजितसिंह देशमुख यांची संपत्ती २.९३ कोटी तर अपक्ष उमेदवार अनिल देसाई १.७७ कोटी तर इतकी संपत्ती आहे.
२००९ च्या निवडणुकीत सातारा-जावळीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची संपत्ती १७.५० कोटी इतकी होती. २०१४ मध्ये मात्र त्यामध्ये जवळपास अकरा कोटींनी वाढ झाली आहे. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती २८.५९ कोटी इतकी असल्याचे नमूद केले आहे.
माजी आमदारांच्या संपत्तीत घट
- दगडू सकपाळ, सदाशिवराव पोळ आणि मदन भोसले या तीनही माजी आमदारांच्या संपत्तीत मात्र गतवेळच्या तुलनेत थोडीफार घट झाली आहे. सकपाळ यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार संपत्ती पाच कोटी ६५ लाख ३४ हजार ८६९ इतकी होती. यंदाच्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेता ही रक्कम दोन कोटी १३ लाख ९४ हजार १९७ इतकी आहे.
- २००९ मध्ये माजी आमदार सदाशिवराव पोळ यांची संपत्ती एक कोटी २२ लाख ७ हजार ४३२ रुपये इतकी होती. यावेळी मात्र त्यामध्ये ११ लाखांने घट झाली असून, एक कोटी १० लाख ५,८२३ रुपये इतकी आहे.
- वाईचे माजी आमदार मदन भोसले यांची २००९ मध्ये असणारी संपत्ती एक कोटी ७४ लाख १५ हजार ५४९ इतकी होती. यावेळी मात्र, त्यामध्ये जवळपास ६५ लाखांनी घट झाली असून, एकूण संपत्ती एक कोटी ७ लाख ८१ हजार ७५६ इतकी आहे. (प्रतिनिधी)