सावधान, ऑनलाईन गंडा घालणारे पोहोचले आपल्या गावात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST2021-09-03T04:41:58+5:302021-09-03T04:41:58+5:30
वाई : ऑनलाईन गंडा घालणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, अनेक लोकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्यानंतर जसजशी लोकांमध्ये जनजागृती होऊ ...

सावधान, ऑनलाईन गंडा घालणारे पोहोचले आपल्या गावात!
वाई : ऑनलाईन गंडा घालणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, अनेक लोकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्यानंतर जसजशी लोकांमध्ये जनजागृती होऊ लागली, तशी ऑनलाईन गंडा घालणारे नवनवीन हातखंडे आजमावू लागले आहेत आणि बेसावध लोक त्यांना बळी पडत असून, आर्थिक फसवणूक होत आहे. आतापर्यंत ऑनलाईन गंडा घालणारे परराज्यातून मोबाईलवर संपर्क साधून फसवणूक करत असत; पण आता हे लोक छोट्या गावांत पोहोचले असून, छोट्या व्यावसायिकांना निशाणा करत आहेत. यापासून सावध होण्याची गरज आहे.
कोरोनाच्या संकटामुळे जवळपास दीड वर्ष लॉकडाऊन होता. यामुळे अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसला. यामध्ये पर्यटन, शिक्षण, दळणवळणसहित अनेक क्षेत्रे प्रभावित झाली. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे पगार निम्मे झाले, तर अनेकांच्या पगारात, उत्पन्नात अनियमितता आली. यामध्ये नागरिकांनी घर-संसार चालविण्यासाठी छोटे-मोठे व्यवसाय करायला सुरुवात करून आपल्या संसाराचा गाडा चालवू लागले. अशीच एक घटना वाई येथील एका एसटी चालकाबरोबर घडली. एकाने वाई स्टँडसमोरील दुकानदाराकडे जेवणाचे डबे कोणाकडे मिळतील, अशी चौकशी केली. त्या दुकानदाराने आपल्या परिचयातील चालकास फायदा व्हावा म्हणून त्यांचा नंबर दिला. त्या व्यक्तीने दुपारी चार वाजता संपर्क साधून मी संरक्षण विभागातून सेवानिवृत्त असून, आम्हाला पाचगणी येथे पंधरा दिवस रोज वीस डबे लागतील, असे बोलला. पैसे रोजच्या रोज दिले जातील. विश्वास बसावा म्हणून मिलिटरी कॅन्टीनचे कार्ड व्हाॅट्सॲपवर पाठविले असून, ते खरे की कोणाचे चोरीचे, हे तपासाअंती कळणार. डब्याचे पैसे ऑनलाईन देण्यासाठी चालकाची केवायसी व बँक खाते माहिती मागून घेतली. आपल्याला रोज वीस डब्यांची ऑर्डर मिळते म्हणून त्या चालकाने सर्व माहिती दिली. ही एव्हाना चालकाच्या पत्नीने डबे तयारही केले. संबंधिताला अपेक्षित माहिती मिळताच चालकाच्या खात्यावरील चार हजार नऊशे रुपये काढल्याचा मेसेज आला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांना खात्यावरील उर्वरित रक्कम दुसऱ्या खात्यावर वर्ग केल्याने नुकसान टळले. त्यांच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली. आता प्रश्न होता वीस डब्यांचे करायचे काय? मग त्यांनी झोपडपट्टीमध्ये जाऊन जेवण वाटले.
कोट..
सर्वत्र सायबर क्राईमचे प्रमाण वाढले असून, मेसेजच्या माध्यमातून कर्ज मंजूर झाले आहे, लॉटरी लागली आहे, अनुदान मंजूर झाले, अशा आमिषाला बळी पडू नये. छोट्या व्यावसायिकांनीही एखादा फोन आल्यास खात्री केल्याशिवाय आपल्यार बँक खात्याची माहिती, वैयक्तिक माहिती देऊ नये. अशी घटना घडल्यास त्वरित पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
- बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक, वाई