बोरी-सुखेडच्या सीमेवर रंगला ‘बोरीचा बार’
By Admin | Updated: August 3, 2014 01:09 IST2014-08-03T01:09:41+5:302014-08-03T01:09:41+5:30
शिव्यांच्या उत्सव : ढोल-ताशांच्या गजरात दोन्ही गावांतील शेकडो ग्रामस्थांनी लावली उपस्थिती

बोरी-सुखेडच्या सीमेवर रंगला ‘बोरीचा बार’
लोणंद : एरव्ही शिवीगाळ करणे म्हणजे संस्कृतीला न शोभणारी गोष्ट मानली जाते. मात्र, वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात अख्खा गाव एकत्र जमून शिव्यांचा उत्सव साजरा करण्याची प्रथा खंडाळा तालुक्यातील बोरी गावाने जपली आहे. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दोन गावांतील शेकडो महिलांनी गावच्या सीमेवरील ओढ्यावर एकत्र जमून मोठ्या उत्साहाने एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहिली. हजारो लोकांच्या साक्षीने बोरी आणि सुखेड गावांतील महिलांनी परंपरागत ‘बोरीचा बार’ साजरा केला.
महाराष्ट्रात शिव्यांची लाखोली वाहण्याचा अनोखा सण खंडाळा तालुक्यातील बोरी गावात साजरा केला जातो. त्यामुळे ‘बोरीचा बार’ राज्यात प्रसिद्ध आहे. श्रावण शुद्ध षष्ठीला हा सण मोठ्या उत्साहाने पार पडतो. शनिवारी बोरी आणि सुखेड गावांतील शेकडो महिला नटूनथटून गावच्या मुख्य पेठेतून ढोल ताशांच्या गजरात फुगडी, झिम्मा असे खेळ खेळत व गाणी म्हणत आनंदाने गावच्या वेशीवर जमा झाल्या. त्यापूर्वी राज्यातील हा आनोखा उत्सव पाहण्यासाठी सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यांतील अनेक लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
प्रथेप्रमाणे दोन्ही गावांच्या सरहद्दीवरील ओढ्या किनारी या महिला जमून एकमेकींना मोठ्या आवाजात शिव्या देतात. एकमेकींना हातवारे करून शिव्या देण्याचा आनंद लुटतात. शनिवारी पावसाची हलकीशी सर असल्याने या आनंदाला पारावर उरला नाही.
दोन्ही गावांतील प्रमुख महिला हातात निरंजनासह हळदी-कुंकवाचे ताट व कडुलिंबाचा पाला घेऊन ओढ्या किनारी पूजन करतात. त्यानंतर ढोल-ताशे व हलगी वाजविली जाते व महिला मोठ्या उत्साहाने हात लावून, हातवारे करून शिव्या देत ओढ्यात शिरतात. वास्तविक यात महिलांची रेटारेटी मोठ्या प्रमाणात होते. दुसऱ्या गावातील महिलेला ओढत नेऊन साडीचोळी देण्याची प्रथा असते. यातून वाद होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने अलीकडे मोठा बंदोबस्त ठेवतात. त्यामुळे कोणतीही ओढाओढी न होता हा पारंपरिक उत्सव पार पडला.
दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा उत्सव सुरू झाला. त्यानंतर केवळ अर्धा तास शिव्या देण्याचा कार्यक्रम सुरू होता. नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर दोन्ही गावांतील प्रमुखांनी प्रथेप्रमाणे महिलांना बाजूला सारून ‘बोरीचा बार’ केला. त्यानंतर महिलांनी गावच्या ग्रामदैवताचे दर्शन घेऊन आपापल्या गावात नागपंचमीच्या खेळाचा आनंद लुटला. (वार्ताहर)