‘स्वाभिमानी’चे उपोषण मागे
By Admin | Updated: August 19, 2014 23:42 IST2014-08-19T23:08:01+5:302014-08-19T23:42:16+5:30
पोलिसांच्या नोटिसांची होळी : मुर्दाड सरकारला हिसका दाखवू : शेट्टी

‘स्वाभिमानी’चे उपोषण मागे
कऱ्हाड : ऊसाला दुसरा हप्ता पाचशे रूपये मिळावा व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाच कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. मंगळवारी सातव्या दिवशी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते हे उपोषण सोडण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील, मनोज घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर सात दिवस उपोषण सुरू होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली देवानंद पाटील, बापूसाहेब साळुंखे, प्रदीप मोहिते, सचिन नलवडे, भाऊसाहेब माने हे उपोषणास बसले होते. उपोषणादरम्यान तिघांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेतली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. सरकार किंवा त्यांचे प्रतिनिधी दखल घेत नाहीत म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. ती मान्य करीत उपोषणकर्त्यांनी मंगळवारी उपोषण मागे घेतले. खासदार शेट्टी मंगळवारी उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत देण्यात आले.
यावेळी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, ‘सात दिवसांत एकाही लोकप्रतिनिधीने उपोषणकर्त्यांची दखल घेऊ नये, ही खेदाची बाब आहे; पण काळजी करू नका. काही दिवसांतच हे लोक मते मागायला तुमच्या दारात येतील. तेव्हा त्यांना दारातसुद्धा उभे करू नका. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुर्दाड सरकारला स्वाभिमानी शेतकरी हिसका दाखवेल. शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे पाप या सरकारने केले आहे. आपण रास्त मार्गाने गुन्हे मागे घ्या, अशी विनंती करतोय. पण त्यांना आमची भाषा समजत नसेल तर हे सरकार उलथवून आपल्या वेदना समजणारे सरकारच सत्तेवर
आणावे.’ (प्रतिनिधी)
दक्षिण-उत्तरवर स्वाभिमानीचाच दावा
कऱ्हाड दक्षिण उत्तर दोन्ही मतदार संघ महायुतीत स्वाभिमानीने मागीतले असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी आवर्जून सांगितले. पण विनायक मेटेंनीही उत्तरची मागणी केली आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, ‘आमचं दोघांचं काय करायच ते ठरलयं,’ असं सुचक वक्तव्य त्यांनी केले.
तहसील कार्यालयासमोर नोटिसांची होळी
स्वाभीमानीने आंदोलन तीव्र करण्याचे जाहिर केल्यानंतर पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या होत्या. त्याचा निषेध म्हणून खासदार शेट्टी यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयासमोर त्या नोटीसांची होळी करून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.