धान्य मळताना सीए बनला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 08:29 IST2016-03-16T08:25:13+5:302016-03-16T08:29:48+5:30
भोसलेवाडीत आनंदाचे वातावरण : पेपर फेरतपासणीनंतर मिळाली उत्तीर्ण झाल्याची बातमी

धान्य मळताना सीए बनला !
अजय जाधव -- उंब्रज भोसलेवाडी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आशिषने सीए ची परीक्षा दिली.. निकाल नापास म्हणून आला; पण खचून जाईल, असं हे शेतकऱ्याचं पोर नव्हते. स्वत:वर ठाम आत्मविश्वास होता. आपण लिहिलेले पेपरची खात्रीही होती. फेरतपासणीचा अर्ज केला. फेरतपासणीत आशिष सीए झाल्याचा निकाल आला आणि वाढदिवसाच्या दिवशीच दिल्ली बोर्डाने ही भेट दिली. भोसले दाम्पत्यांनी दिवसरात्र केलेल्या कष्टाचे फळ मिळाले.
आशिष मनोहर भोसले. आई-वडील शेतीत कष्ट करतात. या आशिष व दोन बहिणीचे शिक्षण ऐवढेच यांचे ध्येय होते. तुटपुंजा उत्पन्नातून मिळणाऱ्या पैशातून तिघांचे शिक्षण करण्याची कसरत हे दाम्पत्य करत होते.
आशिष १२ वी झाला; पण सीए होण्याच्या या ध्येयाने झपाटल्यामुळे त्याने पुणे येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. नोकरी केली. आपल्याबरोबर दोन बहिणींनाही पुणे येथे शिक्षणाला नेले. आज एक बहीण वकील झाली आहे तर दुसरी अकाउंटचे शिक्षण घेत आहे.
अशा आर्थिक परिस्थितीतून आशिषने नोकरी करत सीए ची परीक्षा दिली. जीवनात संघर्ष अटळ असतो. परंतु काहीजणांना प्रत्येक घडामोडीत संघर्ष हा करावाच लागतो. त्याप्रमाणे आशिषला निकालासाठीही फेरतपासणी अर्ज करावा लागला. यश खेचून आणावे लागले. ही माहिती मिळाल्यानंतर प्रस्तूत प्रतिनिधी त्यांच्या घरी भेट देण्यासाठी गेला. तेव्हा आशिष हा आपल्या शेतातील गहू मळत होता. सीए झालो तरी मूळ शेतकरी आहे. शेतीचे काम करणारच असे सांगून त्याने आपली सर्व माहिती हसत सांगितली आणि मी माझे करिअर पुणे येथे करणार आहे. परंतु येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये जाऊन मुलांना कायम मार्गदर्शन करणार आहे. माझ्या गावातील लोकांनाही अकाऊंटंट मधील माहिती विनामूल्य देण्याचा प्रयत्न करणार आहे.
वाढदिनी गिफ्ट!
१० मार्च हा आशिषचा वाढदिवस. या दिवशीच ‘दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टड अकाऊंटंट आॅफ इंडिया’ कार्यालयातून आशिषला फोन आला. ‘आप पास हो गये’ परंतु आशिषने हे कोणाला सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी नेटवर निकाल जाहीर झाला. निकालाची प्रिंट काढली. पुणेहून थेट भोसलेवाडीला आला. आई-वडिलांना सरप्राईज दिले. यावेळी त्या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद यातच माझे यश होते, असे आशिषने ‘लोकमत’ ला सांगितले.