महापुरुषाच्या पुतळा परिसराचे सुशोभिकरण नियोजनबद्ध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:25 IST2021-06-21T04:25:36+5:302021-06-21T04:25:36+5:30

फलटण : ‘लोकमान्य टिळकांचा संस्कृत व इंग्रजी वाङ्‌मयाचा गाढा अभ्यास होता. भारतीय तत्त्वज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी ...

The beautification of the statue area of the great man will be planned | महापुरुषाच्या पुतळा परिसराचे सुशोभिकरण नियोजनबद्ध करणार

महापुरुषाच्या पुतळा परिसराचे सुशोभिकरण नियोजनबद्ध करणार

फलटण : ‘लोकमान्य टिळकांचा संस्कृत व इंग्रजी वाङ्‌मयाचा गाढा अभ्यास होता. भारतीय तत्त्वज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञानाचेही अध्ययन केले होते. राजकीय क्षेत्रात लोकमान्य टिळक काम करत असताना कधी तुरुंगात व अन्यवेळी त्यांना थोडीशी उसंत मिळाली. त्या काळात त्यांनी काही ग्रंथ लिहिले. अशा ह्या महापुरुषाच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभिकरण नगर परिषदेच्या माध्यमातून अत्यंत नियोजनबद्ध होईल,’ असे मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.

फलटण येथील शंकर मार्केटमध्ये लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या आवाराच्या सुशोभिकरण कामाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, महाराष्ट्र साहित्य व कला मंडळांचे सदस्य रवींद्र बेडकिहाळ, नगरसेवक किशोर नाईक-निंबाळकर, नगरसेविका प्रगती कापसे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, तुषार नाईक-निंबाळकर उपस्थित होते.

दीपक चव्हाण म्हणाले, ‘लोकसंग्रहाची दृष्टी राखून लोकमान्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला समाजाच्या लोकांचे अधिष्ठान मिळवून दिले. गीतारहस्य हे त्यांचे अक्षय विचारधन आहे. भारताच्या सर्वांगिण व सर्वंकष राजकीय-सांस्कृतिक कार्याला अनुकूल अशी पार्श्वभूमी निर्माण करण्याचे श्रेय लोकमान्यांना द्यावेच लागते. म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासात टिळकयुग हा फार महत्त्वाचा टप्पा मानण्यात येतो. लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण उत्कृष्ठ दर्जाचेच होईल यामध्ये कसलीही शंका नाही.’

नगरसेवक पांडुरंग गुंजवटे म्हणाले, ‘लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे काम हे जलदगतीने करण्यात येईल. या पुतळा परिसर सुशोभित करण्यासाठी नगरसेवक किशोर नाईक-निंबाळकर, नगरसेविका प्रगती कापसे यांनी विशेष पाठपुरावा केला आहे.’

यावेळी विजय ताथवडकर, अनिरुद्ध रानडे, श्रीराम सहस्रबुद्धे, चंद्रशेखर दाणी, मुकुंद जोशी, सचिन कुलकर्णी, वैभव विष्णूप्रद, मिलिंद लाटकर, किशोर देशपांडे, जयंत सहस्रबुद्धे, सचिन तिवाटणे, पराग देशपांडे, नितीन तारळकर, दर्शन डेंगे, शंतनू रूद्रभटे, अथर्व ढवळीकर, मोबीन इनामदार, दिलीप चवडंके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

फोटो २०फलटण-पुतळा

फलटण येथे लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याच्या परिसरात सुशोभिकरणाचा प्रारंभ आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संजीवराजे नाईक-निंबाळकर उपस्थित होते. (छाया : नसिर शिकलगार)

Web Title: The beautification of the statue area of the great man will be planned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.