कोरोनाच्या लढाईत आरोग्य विभाग सेनापतीविना लढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:34+5:302021-06-23T04:25:34+5:30

नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना संकटामुळे जिल्हा परिषदेकडील आरोग्य विभागावर प्रचंड ताण आहे. अपुऱ्या कर्मचारी, अधिकारीवर्गामुळे ...

In the battle of Corona, the health department will fight without a commander! | कोरोनाच्या लढाईत आरोग्य विभाग सेनापतीविना लढणार!

कोरोनाच्या लढाईत आरोग्य विभाग सेनापतीविना लढणार!

नितीन काळेल

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना संकटामुळे जिल्हा परिषदेकडील आरोग्य विभागावर प्रचंड ताण आहे. अपुऱ्या कर्मचारी, अधिकारीवर्गामुळे कामाचा बोजा वाढलाय. तर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी आणि माता व बालसंगोपन अधिकारी या तीन रिक्त पदांचा भार दुसरेच सांभाळत असतानाच आता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचीच प्रतिनियुक्ती रत्नागिरीला झालीय. त्यांच्या ठिकाणी नवीन कोण येणार निश्चित नाही. त्यामुळे आरोग्य विभागाला यापुढे सेनापतीविनाच लढावे लागणार आहे.

जिल्ह्यात सव्वा वर्षापासून कोरोना विषाणूचे संकट आहे. पहिल्या लाटेत ४० हजार रुग्ण आढळले. तर दुसऱ्या लाटेत आतापर्यंत सव्वा लाखाहून अधिक बाधित सापडले आहेत. कोरोना महामारीच्या या लढ्यात जिल्हा प्रशासनाने उपाययोजना राबविल्या. पण, या महामारीच्या लढाईत जिल्हा परिषद पहिल्यापासून अग्रेसर आहे. अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी प्रथमपासून मोठे योगदान दिले. तर आरोग्य विभागाने संकटाची जाणीव ठेवून सुरुवातीला १०० दिवसांहून अधिक दिवस सुटी व रजाही घेतली नव्हती. अपुरा कर्मचारी वर्ग, अधिकारी कमी असे असतानाही आरोग्य विभागाने संकटाचा मुकाबला केला. आजही आरोग्य विभागाच्या माध्यामातून कोरोना विरोधातील लढाई सुरूच आहे. पण, लढाईच्या काळात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांची रत्नागिरी येथे प्रतिनियुक्ती झाली आहे.

मागील दोन वर्षांपासून डॉ. आठल्ये हे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ऐन कोरोनाच्या संकटातच राज्य शासनाने त्यांची रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्ती केली आहे. ही नियुक्ती देताना साताऱ्याचा कारभार कोण हाकणार हे निश्चित केलेले नाही. पाच दिवसांनंतरही नवीन अधिकारी कोण हे स्पष्ट नाही. सध्या डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांना सोडण्यात आले नाही. पण, शासनाच्या आॅर्डरमुळे जावे लागू शकते. आता फक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाच निर्णय बाकी आहे. यामुळे आरोग्य विभागाला सेनापतीच राहणार नाही. कोरोना विरोधातील लढाई लढण्यासाठी आणखी कोणा अधिकाऱ्याला ‘अतिरिक्त’ म्हणूनच त्यांचा पदभार घ्यावा लागणार आहे.

जिल्हा परिषदेत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी अशी वरिष्ठांची तीन पदे आहेत. सध्या या तीन पदावरही दुसरीकडे पदभार असणारे अधिकारी आहेत. म्हणजेच दोघां अधिकाऱ्यांकडे तीन ठिकाणचा ‘अतिरिक्त’ पदभार आहे. डॉ. सचिन पाटील जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. पण, जिल्हा परिषदेत त्यांना अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम करावं लागत आहे. तर डॉ. प्रमोद शिर्के यांच्याकडे माण तालुका आरोग्य अधिकारी पदभार आहे. सध्या ते जिल्हा माता व बालसंगोपनचे तसेच सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचेही काम करतात. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यानंतर महत्त्वाच्या पदाचाच खेळखंडोबा झालाय. त्याच पदावर आणखी कोणाला कायमस्वरूपी नेमले नाही.

अशा अनेक कारणांमुळे ‘अतिरिक्त’ कारभारी आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर किती काळा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग डोलारा पेलणार हे येणारा काळच ठरवेल. पण, कोरोनाच्या या संकटात लोकप्रतिनिधींनी लक्ष घातल्यास आरोग्य विभाग आणखी ताकदीने लढू शकतो, हे निश्चित.

चौकट :

आंधळ्याचा कारभार लोकांच्या जिवावर...

‘अतिरिक्त’वरच कारभार सुरू असतानाच आता डॉ. अनिरुध्द आठल्ये यांना प्रतिनियुक्तीवर पाठवले. त्यामुळे शासनाचा आंधळ्याचा कारभार लोकांच्या जिवावर उठू शकतो. आता डॉ. आठल्ये यांना प्रतिनियुक्तीवर सोडले तर डॉ. सचिन पाटील यांच्यावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा आणखी एक ‘अतिरिक्त’ पदभार येऊ शकतो. त्यामुळे आहे त्या अधिकाऱ्यांवर आणखी ताण वाढणार आहे. याचा विचार होताना दिसून येत नाही.

चौकट :

५७० जागा भरण्यात येणार...

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत औषध निर्माता, आरोग्यसेवक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञाची १२४५ पदे मंजूर आहेत. यामधील ६२९ पदे रिक्त आहेत, तर सध्या ५७० पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील इतर कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होऊ शकतो.

...................................................................

Web Title: In the battle of Corona, the health department will fight without a commander!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.