लाल दिव्यासाठी भगीरथाची बारामतीची चाकरी

By Admin | Updated: May 5, 2017 22:55 IST2017-05-05T22:40:17+5:302017-05-05T22:55:54+5:30

हिंदुराव नाईक-निंबाळकर : ‘नीरा-देवघर’ प्रकल्पाच्या पाण्यासाठी जनआंदोलन उभारणार

Baramati's work of Bhagiratha for red light | लाल दिव्यासाठी भगीरथाची बारामतीची चाकरी

लाल दिव्यासाठी भगीरथाची बारामतीची चाकरी



लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : ‘तालुक्याचा कायमचा दुष्काळ दूर करू शकणाऱ्या नीरा-देवघर कालव्याची कामे स्वत:ला भगीरथ म्हणून घेणाऱ्या नेत्याच्या लाल दिवा बचाव धोरणामुळे आणि बारामतीकरांच्या चाकरीमुळे रखडली असून, बारामतीकरांना पाणी मिळावे म्हणूनच ते कामे रखडवत असून, संबंध नसताना बारामतीला पाणी जात आहे. कालव्याची कामे पूर्ण करण्यासाठी आता जनआंदोलन उभारणार आहे,’ असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
नीरा-देवघर धरण प्रकल्पाची वस्तुस्थिती व तालुक्यावर पाणी वाटपात झालेला अन्याय या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, काँग्रेस सातारा उपाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, शिवाजीराव फडतरे, फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयकुमार शिंदे, नगरसेवक अशोक जाधव, अशोकराव भोसले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुराव नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नीरा-देवघर प्रकल्पाद्वारे ११,०९१ टीएमसी पाणीसाठा निर्माण करणे व १९८ किलोमीटर लांबीच्या उजव्या कालव्यावरील प्रवाही सिंचनाबरोबर वेनवडी, गावडेवाडी, शेखमिरेवाडी व वाघोशी या चार उपसा सिंचन योजना व २१ किलोमीटर लांबीच्या नीरा-देवघरच्या डाव्या कालव्याद्वारे भोर, खंडाळा, फलटण व माळशिरस या चार तालुक्यांतील ४३,०५० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याचे नियोजन झाले होते. या प्रकल्पावर जानेवारी २०१७ अखेर ७१,६०७ लाख इतका खर्च झाला आहे. या धरणाच्या क्षेत्रात ५७ गावे येत असून, ११,८६० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
फलटण तालुक्यातील ५१ गावांतील १३,५५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. धरणामध्ये प्रतिवर्षी १३ टीएमसी पाणी साठत आहे. केवळ कालव्याची कामे संथगतीने सुरू असल्याने पाणी उपलब्ध असूनही त्याचा वापर सिंचनासाठी करण्यात येत नाही. नियोजित वेळेत कालव्याची कामे झाली असती तर लाभक्षेत्रात असूनही वरील तिन्ही तालुक्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागले नसते आणि लाभ क्षेत्रात नसूनही नीरा-देवघर धरणाचे पाणी नीरा डाव्या कालव्यामार्फत बारामती व इंदापूूरला सिंचनासाठी उपलब्ध झाले नसते. हे दुर्दैवी चित्र गेली बारा ते तेरा वर्षे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे आता खंडाळा, फलटण व माळशिरस या तालुक्यांना हे पाणी मिळण्यासाठी नीरा-देवघर उजव्या कालव्याचे काम युद्धपातळीवर व वेगाने सुरू होणे गरजेचे आहे.
या कालव्याची प्रलंबित कामे झाली नाही तर लाभक्षेत्रात नसूनही आपल्या हक्काचे पाणी कायमस्वरुपी बारामतीला मिळेल. फलटण, माळशिरस हे दुष्काळी तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचित राहतील. त्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक असून, त्यासाठी जनआंदोलन उभारणार आहे.’
नीरा-देवघर प्रकल्प केंद्रीय जल आयोगामधून मंजूर होऊन ‘एआयबीपी’मधून याला भरीव मदत मिळवण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र, याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले नसल्याचा आरोप करून आता केंद्र्रातून निधी मिळण्यासाठी ज्यांनी प्रयत्न करायला हवे ते न करता शिवतारे यांनी जेजुरी व सासवडला पाणी नेले असल्याचेही यावेळी हिंदुराव यांनी सांगितले.
अ‍ॅड. बाळासाहेब बागवान म्हणाले, ‘नीरा-देवघर प्रकल्पासाठी हिंदुराव नाईक-निंबाळकर व मी गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहोत. कृष्णा खोरे महामंडळाच्या अंतर्गत हा प्रकल्प येतो. रणजितसिंह नाईक-निंबाळकर उपाध्यक्ष झाल्यावर या प्रकल्पासाठी १४२ कोटींचा निधी त्यांनी त्वरित मंजूर केला. त्यानंतर सरकार बदलल्यामुळे पुढील कामकाज होऊ शकले नाही.’
दिगंबर आगवणे यांनी आभार मानले.

Web Title: Baramati's work of Bhagiratha for red light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.