बॅँकांमध्ये ‘सावधान’चे फलक !
By Admin | Updated: August 8, 2014 00:44 IST2014-08-07T21:23:45+5:302014-08-08T00:44:35+5:30
जनजागृती : ए.टी.एम. पासवर्डबाबत आवाहन : फसगत झालेल्यांमध्ये सुशिक्षितांचे प्रमाण जास्त

बॅँकांमध्ये ‘सावधान’चे फलक !
रमेश पाटील - कसबा बावडा
बॅँक ग्राहकांनो सावधान...! कोणतीही बॅँक आपल्या ग्राहकाला ए.टी.एम कार्डनंतर पासवर्ड आणि खाते नंबर कधीही फोन करून अथवा मॅसेजद्वारे विचारत नाही. त्यामुळे ग्राहकांनी आपला पासवर्ड कोणालाही सांगू नये, अशा सूचनांचे फलक आता अनेक बॅँकांमध्ये झळकू लागले आहेत. तसेच बॅँक कर्मचारीही ग्राहकाला आपला ‘पासवर्ड’ कोणाला सांगू नका अशा सूचना करू लागले आहेत. तरीही पासवर्ड विचारून ए. टी. एम.मधून पैसे हडप करण्याचे प्रकार कमी झालेले नाहीत.
ए.टी.एम. कार्ड नंबर व पासवर्ड विचारून परस्पर पैसे काढण्याच्या प्रकारांत गेल्या दोन वर्षांत खूपच वाढ झाली आहे. फोन करून गोड आवाजात आपण बॅँकेतून बोलतोय, असे सांगून काही जणांकडून गंडा घालण्याचा उद्योग सुरू आहे. खात्यावरील पैसे गायब झाल्यावर संबंधित फोन बंद झालेला असतो. बॅँकेत येऊन खाते तपासल्यानंतर पैसे गायब झाल्याचे स्पष्ट होते. या पैशाची नंतर बॅँका जबाबदारी घेत नाहीत. अशा घटना वारंवार घडू लागल्याने आता फसवणूक झालेल्या ग्राहकांप्रमाणे बॅँकांही हैराण झाल्या आहेत. अनेक बॅँकेत अशा फसव्या फोन व एस.एम.एस.पासून सावध रहा, अशा सूचना ठिकठिकाणी केल्या आहेत. काही बॅँकेत तर कॅशिअर, बॅँक काउंटर, काचेच्या दारावर अशा ठिकाणी सूचनांचे फलक लावले आहेत. एवढेच नव्हे, तर बॅँकेत पैसे भरायला व काढायला येणाऱ्या ग्राहकांनाही बॅँक कर्मचारी सूचना करू लागले आहेत.
पासवर्ड विचारणारे फोन हे शक्यतो परराज्यातील असल्यामुळे ग्राहक काहीही करू शकत नाहीत, असे प्रकार वारंवार होऊ लागल्याने बॅँकांही आता अशा घटना घडल्याची एखाद्या ग्राहकाची तक्रार आल्यास पोलिसांत तक्रार देऊ लागले आहेत.
बॅँकांचा तीन
कारणांसाठी ‘मॅसेज’
बॅँकांकडून फक्त तीन कारणांसाठीच मॅसेज पाठविला जातो. तो म्हणजे, पैसे काढल्यानंतर, पैसे भरल्यावर व बॅलेन्स चौकशी केल्यानंतर या शिवाय बॅँक कोणालाही मॅसेज पाठवीत नाही, अथवा फोन करीत नाही.
जनजागृती करूनही फसगत
ए.टी.एम.चा पासवर्ड विचारून खात्यातील पैसे गायब होऊ लागल्याने बॅँकांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. तरीही बॅँक ग्राहक फसत आहेत. फसगत झालेल्या ग्राहकांत सुशिक्षित लोकांचाच जास्त भरणा असल्याचे एका बॅँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.