बामणवाडी तलाव असून अडचण नसून खोळंबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST2021-04-23T04:41:15+5:302021-04-23T04:41:15+5:30
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथील पाझर तलावाची दुष्काळकाळात बांधणी करण्यात आली. तेव्हापासून या तलावास पायातूनच गळती असल्याने ...

बामणवाडी तलाव असून अडचण नसून खोळंबा!
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथील पाझर तलावाची दुष्काळकाळात बांधणी करण्यात आली. तेव्हापासून या तलावास पायातूनच गळती असल्याने ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पाणीसाठा संपुष्टात येत आहे. आजवर दोनवेळा गळती काढण्यात आली, मात्र गळती थांबवण्यात संबंधित लघुपाटबंधारे विभागाला यश आले नसल्याने तलाव असून अडचण नसून खोळंबा, अशी अवस्था झाल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
१९७२ च्या दुष्काळानंतर शासनाने ग्रामीण, डोंगरी विभागात जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी पाझर तलाव बांधणी करण्यास सुरुवात केली. या तलावांच्या माध्यमातून पाणी अडविण्यात येऊ लागले. याचदरम्यान १०८०-८१ ला बामणवाडी येथील पाझर तलाव बांधणी करण्यास आली. यावेळी शेतकऱ्यांनी तलाव झाल्यास पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, या आशेने चालू जमीन विनामोबदला तलावनिर्मितीसाठी दिल्या. मात्र, बांधणीपासून या तलावास गळती असल्याने पाणीसाठा जास्त काळ टिकून राहू शकला नाही. मात्र, आज ना उद्या तलाव दुरुस्ती केल्यानंतर आपले स्वप्न पूर्ण होतील, या आशेवर शेतकरी राहिला. मात्र अनेक शेतकरी स्वप्न सत्यात पाहण्याअगोदरच स्वर्गवासी झाले. मात्र, त्यांनी पाहिलेली स्वप्नं त्यांच्या नातवंडांनाही अजून प्रत्यक्ष अनुभवयास मिळाली नाहीत. २०१९ मध्ये जलयुक्त शिवार योजनेत बामणवाडी समाविष्ट करण्यात आल्यानंतर एप्रिल-मे महिन्यात पुन्हा या तलावाची गळती काढण्यात आली. यावेळी नवीन तंत्रज्ञान वापरून एचडीपी (प्लॅस्टिक )पेपरचा वापर करण्यात आला. यावेळी तलावाच्या भिंतीच्या आतील बाजूस चर खोदून हा पेपर टाकण्यात आला. यावेळी संबंधित ठेकेदाराकडून फाटका पेपर टाकण्यात आला. यावेळी संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी फाटका पेपर असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी पेपर चिकटवला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, चिकटवला नसल्याचे बोलले जात आहे. गळती काढण्यात आल्यानंतर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. तलाव पूर्ण क्षमतेने भरला गेला. यावेळी तलावात पाणीसाठा टिकून राहील, या आशेने शेतकरी समाधानी झाला होता. मात्र जास्त वेळ समाधान टिकून राहिले नाही. तलाव पूर्ण क्षमतेने भरला तरीही नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात संपूर्ण पाणीसाठा संपुष्टात येत आहे.
चौकट..
ठेकेदाराने केवळ चार दिवसांत काम उरकले...
तलावाची गळती काढण्यात यावी म्हणून स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे मागणी केली. मात्र, गळती काढण्यास निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात आल्याने अनेक दिवस काम रेंगाळले गेले. त्यानंतर १५ मार्च २००१ ला लघुपाटबंधारे विभागाने तलाव दुरुस्तीकामी मंजुरी दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या नावे ६५ हजार रुपयांचे टेंडर काढण्यात आले. मात्र, ग्रामपंचायतीस कोणतीही माहिती न देता दुसऱ्या ठेकेदाराला काम देण्यात आले. या ठेकेदाराने शासनाचे नियम बासनात गुंडाळून चार दिवसांत काम पूर्ण केले. गळती काढल्यानंतर पहिल्यापेक्षा दुप्पट गळती वाढली. ती कायम तशीच राहिली.
चौकट :
गाळ काढल्यास बारमाही पाणीसाठा...
तलावाची गळती व गाळ काढल्यास बारमाही पाणीसाठा टिकून राहू शकतो. पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने या तलावाची रचना असल्याने विद्युतमोटरीशिवाय पाइपलाइन, पाटाद्वारे काही क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. या पाणीसाठ्यामुळे परिसरातील विहिरींना पाणी स्त्रोत वाढून उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईपासून मुक्ती मिळू शकते.