साताऱ्यात सहायक फौजदाराच्या मुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:40 IST2021-03-31T04:40:06+5:302021-03-31T04:40:06+5:30
सातारा : येथील शाहूनगरमधील जगतापवाडी येथे किरण धनाजी भोसले (वय २६, मूळ रा. सुर्ली, ता. कोरेगाव) या युवकाने राहत्या ...

साताऱ्यात सहायक फौजदाराच्या मुलाची आत्महत्या
सातारा : येथील शाहूनगरमधील जगतापवाडी येथे किरण धनाजी भोसले (वय २६, मूळ रा. सुर्ली, ता. कोरेगाव) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. त्याचे वडील जिल्हा पोलीस दलात सहायक फौजदार या पदावर कर्तव्य बजावत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सहायक फौजदार धनाजी भोसले हे दि. ३० रोजी त्यांच्या मूळगावी सुर्ली येथे गेले होते. सकाळी दहा वाजता त्यांनी मुलगा किरण भोसले याला फोन लावला. मात्र, त्याने तो फोन उचलला नाही. मुलगा किरण हा शाहूनगरमधील जगतापवाडी येथे राहत असल्याने वडील धनाजी भोसले यांनी त्यांच्या एका सहकाऱ्याला मुलाकडे जाण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी घरी जाऊन पाहिले असता किरण भोसले याने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती वडील धनाजी भोसले यांना मिळाल्यानंतर त्यांनी सुर्ली येथून घटनास्थळी जगतापवाडी येथे धाव घेतली. किरण भोसले याने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही. या प्रकाराची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. दरम्यान, किरण भोसले याचा विवाह झाला असून त्याला दोन लहान मुले आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.