कलाकृतींना संस्थांचाच आधार!
By Admin | Updated: December 16, 2014 23:38 IST2014-12-16T22:20:41+5:302014-12-16T23:38:52+5:30
कलाकृतींना संस्थांचाच आधार!

कलाकृतींना संस्थांचाच आधार!
राजीव मुळ्ये -सातारा -केकाळी साताऱ्यात समृद्ध असणाऱ्या सांस्कृतिक चळवळीने पुन:श्च बाळसे धरावे म्हणून ज्या मोजक्या संस्था कार्यरत आहेत, त्या वगळता निर्मिती आणि सादरीकरणाच्या दृष्टीने सांस्कृतिक विश्वात यावर्षीही विशेष भर पडली नाही. विभागीय साहित्य संमेलनाव्यतिरिक्त दोन एकांकिका स्पर्धा, दोन संस्थांनी आयोजित केलेले संगीताचे कार्यक्रम, युवक महोत्सव, ठिकठिकाणच्या नृत्य स्पर्धा, सज्जनगड आणि नटराज मंदिरातील महोत्सव आणि जिल्हा ग्रंथ महोत्सव हीच सांस्कृतिक विश्वाची सीमारेषा राहिली.
साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने उत्तमोत्तम कार्यक्रमांचा नजराणा यावर्षी सातारकरांसमोर ठेवला; तथापि फार मोठा रसिकाश्रय या कार्यक्रमांना लाभला नाही. विभागीय साहित्य संमेलनाबरोबरच मराठी भाषा पंधरवड्यानिमित्तही अनेक कार्यक्रम झाले. लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमांतर्गत शाखेने शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, रवींद्र कोल्हे यांच्याशी संवाद साधण्याची संधी दिली. ऐतिहासिक वास्तूंजवळ फलक उभारण्याची मोहीम शाखेने पालिकेच्या मदतीने हाती घेतली.
नाट्य परिषदेच्या सातारा शाखेने २०१४ चा प्रारंभ समर्थ करंडक एकांकिका स्पर्धांनी केला. राज्यभरातील सुमारे चाळीस संघांनी धार्मिक कलहांपासून आदिवासींमधील अपरिचित परंपरांपर्यंत अनेक विषयांची मांडणी केली. तत्पूर्वी शाहूपुरीत ध्रुव करंडक एकांकिका स्पर्धा झाल्या. एकांकिका हे प्रभावी माध्यम असले तरी संहितांचा दुष्काळ जाणवतो, हे ओळखून मराठी रंगभूमी दिनानिमित्त नाट्य परिषदेच्या सातारा शाखेने एकांकिका लेखन स्पर्धाही घेतली.
वर्षारंभी झालेल्या जिल्हा ग्रंथ महोत्सवात यावर्षी शंभर स्टॉलच्या माध्यमातून अंदाजे दीड ते दोन कोटी रुपयांची पुस्तकविक्री झाली आणि सातारकरांनी आपले ग्रंथप्रंम व्यक्त केले. उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध असणारे दुकानही नसणाऱ्या या शहरात वाचनसंस्कृती किती मोठ्या प्रमाणावर टिकून आहे, याचाच हा पुरावा. महोत्सवात परिसंवाद, मनोरंजक आणि उद्बोधक कार्यक्रम झाले आणि कळस चढविला.
संगीताच्या क्षेत्रात पंचम ग्रुपने शास्त्रीय संगीताच्या मैफली आयोजित केल्या. सेलिब्रिटींची पावले साताऱ्याकडे वळविणाऱ्या हेरंब फाउंडेशनने आशिकी-२ फेम अरिजित सिंग आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप आमंत्रित केला. गाण्यांचे रचनाकार बप्पी लहरी सादरीकरण करून गेले.