‘मोरया’च्या गजरात विघ्नहर्त्याचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:40 IST2021-09-11T04:40:41+5:302021-09-11T04:40:41+5:30
कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे बाजारपेठ सुरू असून गत आठवड्यापासून गणेशोत्सवाचा उत्साह बाजारपेठेत दिसून येत होता. खरेदीसाठी ...

‘मोरया’च्या गजरात विघ्नहर्त्याचे आगमन
कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे बाजारपेठ सुरू असून गत आठवड्यापासून गणेशोत्सवाचा उत्साह बाजारपेठेत दिसून येत होता. खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. तसेच कुंभारवाड्यातही मूर्ती पाहण्यासाठी भाविक गर्दी करीत होते. संक्रमण कमी झाले असले तरी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत यंदाही अनेक मंडळांनी मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली नाही. प्रातिनिधीक स्वरुपात गावात एकाच ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना अंमलात आणली आहे. मलकापूर पालिकेने ‘एक शहर, एक गणपती’ ही संकल्पना स्वीकारली असून सत्ताधारी, विरोधी नगरसेवकांनी मंडळांना आवाहन केले होते. त्यानुसार सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच सार्वजनिक मंडळांनी या उपक्रमास प्रतिसाद दिला.
कराड शहरात सार्वजनिक मंडळांनी यंदा गणेशोत्सवाला बगल दिल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर कोठेही मंडळांची उभारणी करण्यात आलेली नाही. तालुक्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी मंडळांनी मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे; मात्र मंडळांची संख्याही मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी सकाळपासून कुंभारवाड्यात मूर्ती घेण्यासाठी भाविकांची गर्दी दिसून येत होती. दिवसभर भाविकांची त्याठिकाणी रीघ लागली होती. कोरोना संक्रमण कमी झाल्यामुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत होता.
- चौकट
बाजारपेठेत लाखोंची उलाढाल
गतवर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते. ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे बाजारपेठ बंद होती. परिणामी, गणेशोत्सवाच्या खरेदीला मुरड घालून साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागला होता; मात्र यावर्षी कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे बाजारपेठेवर कसलेही निर्बंध नाहीत. रात्री दहा वाजेपर्यंत बाजारपेठ खुली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाली.
फोटो : १०केआरडी०२, ०३
कॅप्शन : कराडच्या कुंभारवाड्यातून भाविकांनी शुक्रवारी भक्तिभावाने गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेली. (छाया : माणिक डोंगरे)