पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या गावातीलच ग्रामसभेत धक्काबुक्की; पेयजल योजनेचा पाणी प्रश्न चिघळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 11:58 AM2024-01-02T11:58:38+5:302024-01-02T12:00:21+5:30

सरपंचांची पोलिसांत तक्रार, दहा जणांवर गुन्हा

Argument in the gram sabha of guardian minister Shambhuraj Desai village over drinking water scheme water issue | पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या गावातीलच ग्रामसभेत धक्काबुक्की; पेयजल योजनेचा पाणी प्रश्न चिघळला 

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या गावातीलच ग्रामसभेत धक्काबुक्की; पेयजल योजनेचा पाणी प्रश्न चिघळला 

मल्हारपेठ : पेयजल योजनेच्या कामावरून सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे गाव असलेल्या मरळीच्या ग्रामसभेत वादावादी, धक्काबुक्की झाली. या वादानंतर सरपंचांनी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून दहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी घडली.

सरपंच कांचन संभाजी पाटील (रा. मरळी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून, प्रवीण लक्ष्मण पाटील, धनाजी लक्ष्मण पाटील, जितेंद्र साहेबराव पाटील, संदेश सयाजी पाटील, शुभम शरद पाटील, संग्राम भीमराव पाटील, संजय विजय सणस, अनिकेत उत्तम पाटील, संजय एकनाथ पाटील, राजेंद्र रामचंद्र पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयात शनिवारी ग्रामसभेचे आयोजन केले होते. कांचन पाटील ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी उपसरपंच व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेतील सर्व विषय संपल्यानंतर परवानगी न घेता ऐनवेळेच्या विषयावेळी माजी सरपंच प्रवीण लक्ष्मण पाटील यांनी पेयजल योजना सुरळीत चालत नसलेबाबतचा विषय मांडला. त्यावर माजी उपसरपंच कृष्णा कदम यांनी पेयजल योजनेचे काम केलेले ठेकेदार यांना बोलावून कामाची चौकशी करू, असे ग्रामसभेमध्ये उत्तर दिले.

त्यावेळी प्रवीण पाटील यांनी तुम्ही पाच वर्षे काय केले? असे म्हणत शिवीगाळ करू लागले. सरपंच त्यांना शांत राहणेबाबत सांगत होते. तरी त्यांनी काही न ऐकता प्रवीण पाटील व धनाजी पाटील यांनी कृष्णा कदम यांना तसेच संभाजी पाटील हे भांडणे सोडवायला गेले असता त्यांना अनिकेत पाटील, शुभम पाटील, संग्राम पाटील, संजय सणस यांनी धक्काबुक्की केली. तर विलास कदम यांना संजय पाटील यांनी श्रीमुखात लागावली. तसेच कृष्णा कदम यांच्या अंगावर राजेंद्र पाटील हे मारण्यासाठी धावून जात होते. प्रवीण पाटील व धनाजी पाटील यांनी ग्रामसभा घेऊ नका, बंद करा. तुम्हाला गावची कामे करता येत नाहीत, असे म्हणत ग्रामसभा बंद पाडली.

पोलिस अधीक्षकांकडून घटनास्थळी पाहणी

पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे गाव असलेल्या मरळीतील ग्रामसभेत वाद झाल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर करत आहेत.

Read in English

Web Title: Argument in the gram sabha of guardian minister Shambhuraj Desai village over drinking water scheme water issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.