पशु-पक्षी थेट गाव-वाडीवस्तींवर!

By Admin | Updated: May 6, 2017 16:33 IST2017-05-06T16:33:38+5:302017-05-06T16:33:38+5:30

पाण्यासाठी काय पण : उन्हाच्या तडाख्याने स्थिती ; वानर, कावळे माणसाळू लागले

Animals-birds live in village-wadi | पशु-पक्षी थेट गाव-वाडीवस्तींवर!

पशु-पक्षी थेट गाव-वाडीवस्तींवर!

आॅनलाईन लोकमत

औंध (जि. सातारा), दि. 0४ : खटाव तालुक्यात उन्हाचा कडाका कायम आहे. त्यामुळे पशुपक्षाचा अन्न आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शक्यतो कधीही न माणसाळणारे पशु-पक्षी सध्या जनमानसात, वाडी-वस्तीवर येऊन आपली तहान-भूख भागवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अन्नपाण्यासाठी कायपण असेच हे चित्र आहे.

यावर्षी तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. खटाव तालुक्यातील औंध परिसरातील अनेक गावांमधील जनजीवन अक्षरश: होरपळून निघाले आहे. अनेक गावांमध्ये सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अघोषीत संचारबंदी लागू होत आहे असेच चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणचे पाणवठे, जलसाठे कोरडे पडले आहेत. रानामधील सुगी संपली आहे.

सर्वत्र रूक्ष वातावरण निर्माण झाले आहे. त्याची झळ अनेक पशु-पक्षी प्राणी, वानर, माकड, मोर, लांडोर, विविध प्रकारचे पक्षी, छोटेमोठे जीव, किटक कृमी यांना बसू लागली आहे. जमीन मोकळी झाल्याने या प्राण्यांना त्याठिकाणी खायला काहीच उपलब्ध नाही.

पाणीसाठे मोकळे झाल्याने अन्नपाण्यासाठी वानर, पक्षी व अन्य प्राणी गावांमध्ये येऊ लागले आहेत. मागील काही दिवसांमध्ये औंध, कुरोली, जायगाव, खरशिंगे, गोपूज व अन्य गावे वाड्यावस्त्यांवर त्यांनी ठाण मांडल्याने हे प्राणी माणसाळले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना अन्नपाणी दिले जात आहे. पण काही ठिकाणी त्यांची भटकंती सुरू आहे. पुढील दोन महिने या मुक्या जीवांना कसे जाणार? याचीच धास्ती निर्माण झाली आहे.


औंध डोंगर परिसरात पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था...
औंध येथील शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या सभासदांनी औंध येथील डोंगर परिसरात पक्ष्याचा वावर असलेल्या जवळपास वीस ठिकाणी अंदाजे दीड लिटर पाणी बसेल एवढे कॅन झाडांना अडकवून त्यांची व्यवस्था केली आहे. एक दिवसाआड त्यामध्ये पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे बऱ्यापैकी पक्षी तेथे आपली तहान भागवतात. अनेक सामाजिक संघटनांनी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

माणुसकीचे दर्शन...

अनेक ठिकाणी पाणी, अन्नपदार्थ मिळविण्यासाठी पशुपक्षांची गावागावांत येणारी थेट भेट पाहून सामाजिक संस्था, पर्यटक, नागरिक यांच्याकडून या प्राण्यांची, पक्षांची अन्नाची पाण्याची व्यवस्था केली जात आहे. याद्वारे माणुसकीचे दर्शन घडविले जात आहे. याद्वारे प्राण्यांना पक्षांना त्यांच्या आवडीचे अन्नधान्य, फळे, खाद्यपदार्थ देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Web Title: Animals-birds live in village-wadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.