औंध : गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स या साखर कारखान्याकडून ऊस बिल वेळेत न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी कारखान्याच्या गेटसमोर, तसेच ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन केले, तसेच प्रशासनाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली. संतप्त शेतकऱ्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.औंधचे पोलिस उपनिरीक्षक मयेकर, पोलिस हवालदार साहिल झारी यांनी मध्यस्थी केली, तर असिस्टंट जनरल मॅनेजर यांनी लेखी पत्र दिल्यानंतर अखेर सायंकाळी तोडगा निघाला.गोपूजच्या साखर कारखाना प्रशासनाने आतापर्यंत तीन वेळा बिल देण्याच्या तारखा जाहीर केल्या. मात्र, त्या सर्व तारखा खोट्या ठरल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. ‘प्रत्येक वेळी तारीख देतात; पण पैसे खात्यात जमा होत नाहीत. त्यामुळे आमची आर्थिक अडचण वाढत आहे,’ अशी भावना आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सध्या शेतीसाठी लागणारे खत, बियाणे, औषधे, तसेच घरगुती खर्चासाठी, सोसायटी कर्ज, व्याज भरण्यासाठी शेतकरी ऊस बिलावरच अवलंबून असतात. मात्र, बिल न मिळाल्याने अनेक शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत. शेतकऱ्यांनी ‘आता आश्वासन नको, पैसे द्या,’ अशी ठाम भूमिका घेतली होती.यावेळी स्वाभिमानीचे विकास गोडसे, सत्यवान गलंडे, गौरव पवार, शंकर पवार, चैतन्य पवार, संजय गोडसे, राजेंद्र गोडसे, तानाजी गोडसे, दत्तात्रय माने, संतोष गोडसे, बाळू इंगळे, सचिन खुस्पे, बापू पवार आदींसह ६० ते ७० शेतकरी उपस्थित होते.दरम्यान, शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कारखाना व्यवस्थापनाकडून असिस्टंट जनरल मॅनेजर घुले यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून १३ मार्च रोजी बिल अदा करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर सायंकाळी उशिरा शेतकऱ्यांनी कारखाना परिसर सोडला. मात्र, १३ तारखेला बिल मिळाले नाही, तर तीव्र आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी औंध पोलिस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Web Summary : Satara farmers, angered by delayed sugarcane payments from Green Power Sugars, locked factory officials in protest. Police intervened, and management promised payment by March 13th, averting further unrest. Farmers threaten renewed agitation if promise fails.
Web Summary : ग्रीन पावर शुगर्स द्वारा गन्ना भुगतान में देरी से नाराज़ सतारा के किसानों ने विरोध में फैक्ट्री अधिकारियों को बंद कर दिया। पुलिस ने हस्तक्षेप किया, और प्रबंधन ने 13 मार्च तक भुगतान का वादा किया, जिससे आगे अशांति टल गई। किसानों ने वादा विफल होने पर फिर से आंदोलन की धमकी दी।