दारुअड्डा केला उद्ध्वस्त
By Admin | Updated: January 28, 2015 00:57 IST2015-01-27T22:35:50+5:302015-01-28T00:57:52+5:30
सांगवी ग्रामस्थ आक्रमक : अवैध दारु विक्री करणाऱ्यांना हिसका

दारुअड्डा केला उद्ध्वस्त
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील सांगवी याठिकाणी ग्रामस्थांनी शिरवळ पोलिसांच्या सहकार्याने अवैध हातभट्टीच्या दारुची विक्री करणाऱ्या १२ ठिकाणी हल्लाबोल करीत अवैध दारुचा अड्डा उध्वस्त केला. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.अवैध दारुविक्रीचा प्रश्न नागरिकांना बेसुमार भेडसावत असून याबाबत सांगवी येथील प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत प्रचंड गदारोळ झाला. यावेळी सांगवीच्या सरपंच मंदाकिनी वीर, उपसरपंच सुनील गायकवाड यांनी खंडाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक शेळके यांना याची माहिती दिली. या अड्ड्याबाबत ग्रामस्थ आक्रमक असल्याचेही त्यांनी सांगितले.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेळके यांनी पोलीस उपनिरीक्षक गोरख बोबडे, पोलीस हवालदार रवींद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक रफिक पटेल, स्वप्नील दौंड, एस.टी. मदने, अमोल जगदाळे, अरुण भिसे यांना सांगवी येथे जाण्याचे आदेश दिले. घटनेची नोंद शिरवळ पोलिसात झाली असून तपास हवालदार अरुण भिसे करत आहेत. (प्रतिनिधी)
सांगवीच्या सरपंच मंदाकिनी वीर, उपसरपंच सुनील गायकवाड, विठ्ठल वीर, मंगेश वीर, विकास वीर, किरण वीर, हिम्मत वीर या तरुणांच्या मदतीने शिरवळ पोलिसांनी एका कंपनीच्या पाठीमागे उघड्यावर छापा टाकला. त्याठिकाणी तैय्यब बकसू तांबोळी (रा. सांगवी) याला तसेच दुसऱ्या ठिकाणी एका कंपनीसमोर मोकळ्या जागेत दारुविक्री करणारा अनिल अंतरलाल कुंभार (वय ४२, रा. धनगरवाडी, ता. खंडाळा) व रेमश सिनू चव्हाण (वय २0, रा. शिरवळ, मूळ हैद्राबाद) याला रंगेहाथ पकडले.