आमिरी पाहुणचार... संतापले आमदार !
By Admin | Updated: April 17, 2016 23:31 IST2016-04-17T22:41:36+5:302016-04-17T23:31:55+5:30
प्रशासनाच्या भूमिकेवर हल्लाबोल : कार्पोरेट दुष्काळ हटाव मोहीम नंतर राबवा... अगोदर तहानलेल्या गावांना टँकर अन् छावण्या पुरवा

आमिरी पाहुणचार... संतापले आमदार !
सातारा : ‘वॉटर कप’ स्पर्धेसाठी रविवारी साताऱ्यात आलेल्या अभिनेता आमीर खानचा खासगी दौरा जिल्ह्यात भलताच वादग्रस्त ठरला. सुटीच्या दिवशी अख्खं प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालयात आमीरच्या दिमतीला आलेलं पाहून चिडलेल्या स्थानिक आमदारांनी अधिकाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
रविवारी साताऱ्यात आमीरनं दुष्काळी भागातील ‘वॉटर कप’ स्पर्धेवर चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र, बैठकीला आमीर खान असणार आहे, हे शेवटपर्यंत संबंधितांना वरिष्ठांनी कळू दिले नव्हते. सकाळी हेलिकॉप्टरने सैनिक स्कूलच्या मैदानावर उतरल्यानंतर आमीर थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच रवाना झाले. याठिकाणी कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी ठेवला होता. काहीजण आपले ओळखपत्र पोलिसांना दाखवून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पोलिसांकडून संबंधितांना ‘तुम्ही कोणीही असा; पण आतमध्ये तुम्हाला सोडले जाणार नाही. कलेक्टरांचा सक्त आदेश आहे. वाटल्यास तुम्ही त्यांना फोन करा. तरच आतमध्ये सोडतो,’ अशी मजेशीर उत्तरे मिळत होती. आमच्या गावातही जलसंधारणाची कामे व्हावीत, यासाठी मी आमीर खानची भेट घेण्यासाठी आलो असल्याचे शिरवळ येथील दादा भोसले यांनी सांगितले. मात्र, त्यांनाही पोलिसांनी आतमध्ये सोडले नाही.
दरम्यान, प्रशासनाच्या भूमिकेबद्दल लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. ‘जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करायला ज्यांना अनेक दिवस लागतात. दुष्काळी भागात विंधन विहिरी मंजूर करायला, ज्यांना दोन-दोन महिने लागतात, अशी अधिकारी मंडळी सुटीच्या दिवशीही मोठ्या उत्साहाने एका सेलिब्रिटीच्या खासगी बैठकीला सरकारी कार्यालयात आवर्जून उपस्थित राहतात, हे मात्र, धक्कादायक आहे,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादीचे माजी मंत्री शशिकांत शिंदे अन् काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला टार्गेट केले.
‘दुष्काळावर मात करत असल्याची ‘कार्पोरेट शो’ बाजी बंद करा अन् अगोदर दुष्काळग्रस्तांसाठी मूलभूत गरज असलेल्या टँकर, छावण्यांचे प्रस्ताव मंजूर करा,’ अशा भाषेतही दोन्ही काँग्रेसचे आमदारही जिल्ह्यातील प्रशासनाच्या भूमिकेवर संतप्तपणे तुटून पडले. (प्रतिनिधी)
मोबाईल बंदी असतानाही फोटो !
आमीर खानची ही बैठक नियोजित होती. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. मात्र येताना कोणीही आतमध्ये मोबाईल घेऊन यायचा नाही, अशा सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही काहीजणांनी बैठकीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केलेच.
लोकप्रतिनिधींना टाळून कसा हटणार दुष्काळ ?
ज्या दुष्काळी भागाचा कायापालट करण्यासाठी आम्ही आयुष्यभर संघर्ष करत आलो, त्या गावांसाठी आमीर खानसारखा एखादा अभिनेता जिल्ह्यात येत असेल तर त्याला आमची कधीच हरकत असणार नाही. मात्र, आमच्या जिल्ह्यातील एवढ्या महत्त्वाच्या उपक्रमाबाबतच्या मिटिंगची साधी माहितीही प्रशासन जर लोकप्रतिनिधींना कळवत नसेल तर मात्र, खूप संतापजनक आहे. असे अनेक सेलिब्रिटी एक दिवसासाठी येतील अन् जातील, त्यामुळे या अशा लोकांच्या ताटाखालचे मांजर व्हायचे का, याचा विचार प्रशासनाने करावा, अशा भाषेत आमदार जयकुमार गोरे यांनी संताप व्यक्त केला.
आमीर खानच्या वैयक्तिक संस्थेची ही खासगी बैठक असेल तर तो त्याचा विषय आहे. मात्र, सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत ही बैठक गुपचूपपणे घेतली जात असेल तर मात्र, लोकप्रतिनिधी म्हणून याचा जाब विचारावाच लागेल, असे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले.
‘अलिकडे काही अभिनेत्यांना सातारा जिल्ह्यात आणून त्यांच्यासोबत स्वत:ची टिमकी वाजवून घेणाऱ्या स्वयंघोषित जलतज्ञाची चमकोगिरी आता थांबवलीच पाहिजे,’ अशा खरमरीत भाषेतही जयकुमार गोरे यांनी साताऱ्याच्या एका डॉक्टरला फटकारले. ‘सरकारी पुरस्कारासाठी धडपडू पाहणाऱ्या या स्वयंघोषित समाजसेवकाने अजिंक्यताऱ्यावरची व्हिडिओ क्लिप ज्या पद्धतीने फिरविली आहे, ते पाहता भविष्यात जिल्ह्यातील दुष्काळ मीच हटविला, अशी शेखी मिरवायलाही ते मागे पुढे पाहणार नाहीत,’ अशीही भीती गोरे यांनी व्यक्त केली.