सातारा : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेली असून प्रशासनाने ही कोरोनाची लाट आटोक्यात आणण्यासाठी आणखी नवे दहा हॉस्पिटल सुरू केली आहेत. मात्र, तरीसुद्धा व्हेंटिलेटर बेडची कमतरताच रुग्णांना भासत आहे.
जिल्ह्यात कोरोनाने एक लाखाचा टप्पा पार केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे प्रशासन अक्षरशः हतबल झाले आहे. सुरुवातीला सातारा जिल्ह्यामध्ये एकूण ४९ हॉस्पिटल होती. मात्र, कोरोनाची रुग्ण संख्या वाढल्यानंतर हळूहळू रुग्णालय नव्याने सुरू करण्यात आली. जिल्ह्यात १७ कोरोना सेंटर आणि ६८ हॉस्पिटल अशी ८५ हॉस्पिटल आहेत. मात्र, तरीसुद्धा रुग्णालयातील बेड रुग्णांना उपलब्ध होत नाहीत. अत्यंत भयावह परिस्थिती असून रुग्णांचे नातेवाईक बेड मिळत नसल्याने हतबल झाले आहेत. चार दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने नवे १० हॉस्पिटल सुरू केली. जवळपास शंभर बेडची क्षमता नव्याने उपलब्ध झाली. मात्र, जिल्ह्यात दिवसाला २२०० रुग्ण आढळून येत असल्यामुळे ही शंभर बेडची क्षमताही आता अपुरी पडू लागली आहे. जिल्ह्यातील संपूर्ण ८० हॉस्पिटलमध्ये केवळ १२ ते १४ रोज व्हेंटिलेटर बेड शिल्लक असल्याचे समोर येत आहे. मात्र, रात्री पुन्हा हे बारासुद्धा बेड शिल्लक राहत नाहीत.
दोन हजार रुग्ण बाधित येत असताना यामध्ये अनेकांना श्वसनाचा त्रास होत आहे. त्यामुळे या रुग्णांना वेळीच जर ऑक्सिजन मिळाले नाही तर या रुग्णांचा जीव धोक्यात जाण्याची शक्यता असते. ऑक्सिजनचे बेड मिळण्यासाठी नातेवाईक रात्र-रात्रभर हॉस्पिटलच्या बाहेर ताटकळत उभे राहत आहेत. एखादा दुसरा रुग्ण दगावल्यानंतर त्याच्या जागी बेड मिळण्यासाठी अक्षरश: चढाओढ होत आहे. जिल्ह्यात दोनशेहून अधिक रुग्णालय आहेत. ही सर्व रुग्णालय कोविडसाठी शासनाने अधिग्रहण करणे गरजेचे असल्याचे मतही आता आरोग्य विभागाकडून व्यक्त होऊ लागले आहे.
चौकट : जिल्ह्यातील १७ कोरोना सेंटरमधील बेडची क्षमता
एकूण बेड १५१६
व्हेंटिलेटर बेड १७०
विदाऊट व्हेंटिलेटर बेड १२७
ऑक्सिजन बेड ९९४
......
चौकट : सोमवारी सायंकाळपर्यंत शिल्लक बेड
व्हेंटिलेटर बेड १४
विदाऊट व्हेंटिलेटर बेड २७
वुईथ ओटू बेड ५३८