अजित पवारांच्या साखरेला ‘भगवा उतारा’
By Admin | Updated: December 13, 2014 23:53 IST2014-12-13T23:53:46+5:302014-12-13T23:53:46+5:30
शिवसैनिकांचे आंदोलन : जरंडेश्वर शुगर मिल्सची साखर वाहतूक रोखली

अजित पवारांच्या साखरेला ‘भगवा उतारा’
कोरेगाव : शेतकरी व कामगारांच्या हिताकडे कायम दुर्लक्ष करत मनमानी कारभार होत असल्याचा आरोप करत जरंडेश्वर शुगर मिल्सच्या व्यवस्थापनाला शिवसेनेने शनिवारी गनिमी कावा करत जेरीस आणले. माजी उपमुख्यमंत्री यांच्याशी संबंधित या कारखान्याची साखर गुजरातकडे निघालेली असताना शिवसैनिकांनी अडविली.
सेनेचे उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनी शनिवारी सायंकाळी सातारा-पंढरपूर राज्यमार्गावरच साखरेचे ट्रक रोखून धरले. त्यानंतर, व्यवस्थापनाने विनवणी केल्यामुळे बुधवारपर्यंतची मुदत दिली. मागण्या मान्य न झाल्यास बुधवारनंतर कारखान्याची तयार झालेली साखर पूर्णत: रोखणार असल्याचे बर्गे यांनी सांगितले.
जरंडेश्वर शुगर मिल्सने शेतकऱ्यांना गत गळीत हंगामातील पाचशे रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता द्यावा आणि कारखान्यातील कामगारांना दौंड शुगर्सच्या धर्तीवर बोनस द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने दि. २० नोव्हेंबर रोजी कोरेगावात रास्ता रोको आंदोलन केले होते. कारखाना कार्यस्थळावर जाऊन संपर्क प्रमुख नरेंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे व युवराज पाटील यांनी सरव्यस्थापक नवनाथ बंडगार यांच्याशी चर्चा करत सकारात्मक तोडगा काढण्यास सांगितले होते. तोडगा न निघाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
शिवसेनेच्या आंदोलनाला तीन आठवडे उलटून गेल्यानंतरही जरंडेश्वरच्या व्यवस्थापनाने त्याकडे लक्ष न देता कामकाज सुरू ठेवले होते. कारखाना व्यवस्थापनाला जागे करण्यासाठी शिवसेनेने शनिवारी सायंकाळी गनिमी काव्याने कारखान्याची गुजरातकडे निघालेली साखर अडविण्याचा निर्णय घेतला.
रितेश बर्गे, अक्षय बर्गे, रोहन बर्गे, रवींद्र बर्गे, रमेश बर्गे, भरत भोज, महालिंंग जंगम, नीलेश यादव, सागर शिंंदे, सुनील बर्गे, किशोर धुमाळ, नीलेश फडतरे, तेजस गुरव, सोमनाथ गुरव, विक्रम बर्गे, विशाल बर्गे आदींसह शिवसैनिकांनी चिमणगाव फाटा येथील कारखान्याच्या गेटकेन रस्त्यानजीक साखर वाहतूक करणारे ट्रक अडविले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सातारा-पंढरपूर राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची धावपळ झाली.
पोलीस कर्मचारी गणेश ताटे यांच्यासह पथकाने आंदोलनस्थळी धाव घेत कारखाना व्यवस्थापनास चर्चेसाठी बोलाविले. मुख्य लेखापाल येवले यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली आणि त्यांनी शिवसैनिकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला; मात्र दिनेश बर्गे हे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
कारखाना व्यवस्थापनाला शेतकरी आणि कामगारांबाबत आस्था नसेल, तर यापुढे कारखाना कसा चालू राहतो, हेच शिवसैनिक पाहतील, असा इशारा दिला. अखेरीस येवले यांनी व्यवस्थापनातील अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा करत मुदत देण्याची विनंती केली. पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर बुधवारपर्यंतची मुदत देण्यात आली. (प्रतिनिधी)