वाईत एप्रिलअखेर ५० हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट : कुसुरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:37 IST2021-04-06T04:37:56+5:302021-04-06T04:37:56+5:30
वाई : ‘वाई सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे जनजागृती करून, प्रोत्साहन देऊन, नावनोंदणी करून वाई तालुक्यातील ५० हजार नागरिकांना एप्रिलअखेरपर्यंत कोविड ...

वाईत एप्रिलअखेर ५० हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट : कुसुरकर
वाई : ‘वाई सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे जनजागृती करून, प्रोत्साहन देऊन, नावनोंदणी करून वाई तालुक्यातील ५० हजार नागरिकांना एप्रिलअखेरपर्यंत कोविड लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी नियोजन बैठकीत दिली.
यावेळी नायब तहसीलदार गीतांजली गरड यांची प्रमुख उपस्थिती होती. ४५ वर्षांपर्यंतच्या शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी तालुक्यातील २८ आरोग्य उपकेंद्रे व पाच केंद्रांवर लसीकरण होणार आहे. यासाठी पूर्व नावनोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी आधार कार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र आवश्यक आहे. मोबाइल ॲपवर नावनोंदणी केलेल्या व्यक्तींही लस दिली जाणार आहे.
त्यासाठी नोडल ऑफिसर, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक व तंत्रस्नेही शिक्षक यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दरदिवशी प्रत्येक उपकेंद्रावर किमान १५० नागरिकांचे लसीकरण होईल, असे नियोजन करण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव यांनी केले. ‘ब्रेक द चेन’ कार्यक्रमांतर्गत ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला आता ४८ तासांमध्ये केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल किंवा लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठीही नागरिकांनी चाचणी करून सहकार्य करावे. लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. संदीप यादव यांनी केले आहे.