गोंदियातील कृषी अधिकाऱ्यांचा चाफळच्या शेतकऱ्यांशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:18+5:302021-06-17T04:26:18+5:30

चाफळ : आज जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. अशा कठीण परिस्थितीत माणूस माणसाजवळ जायला घाबरू लागला आहे. वृक्षांनासुध्दा आज ...

Agriculture officials in Gondia interact directly with Chafal farmers | गोंदियातील कृषी अधिकाऱ्यांचा चाफळच्या शेतकऱ्यांशी थेट संवाद

गोंदियातील कृषी अधिकाऱ्यांचा चाफळच्या शेतकऱ्यांशी थेट संवाद

चाफळ : आज जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. अशा कठीण परिस्थितीत माणूस माणसाजवळ जायला घाबरू लागला आहे. वृक्षांनासुध्दा आज या ना त्या किडीने व रोगाने ग्रासले आहे. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यायला हवी. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन कृषी विभाग गोंदियाचे मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत कोळी यांनी चाफळ विभागातील शेतकरी बांधवांशी संपर्क साधत झाडांवरील "भिरुड शत्रू किडी"बाबत मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गोंदियाचे मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी यांनी चाफळला गेली बरचशी वर्षे कृषी सहायक, पर्यवेक्षक म्हणून काम केले आहे. प्रभू रामचंद्राच्या पवित्र भूमीशी जोडली गेलेली नाळ व येथील शेतकऱ्यांविषयीची आपुलकी आजही जपत ते परिसरातील शेतकरी बांधवांना लांब असूनही वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. नुकतेच त्यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या यानिमित्ताने चाफळ विभागातील शेतकरी बांधवांशी विभागात कार्यरत असलेल्या " सोनेरी क्षणांचा ग्रुप " या ग्रुपच्या माध्यमातून संपर्क साधत मोलाचे मार्गदर्शन केले.

कोळी म्हणाले, आंबा आणि इतर अनेक झाडांच्या खोडावर येणारे भिरुड नावाचे खोडकीड आहे. भिरुड ही एक महाभयंकर खोडकीड आहे. भिरुड किडीस वृक्षांचा कॅन्सर म्हणतात. कारण एकदा भिरुड झाडाला लागला की झाडाचा अंत होतो व झाड कोसळतं. झाडांच्या बुंध्यामध्ये अंडी, अळी, कोष, भुंगेरे ही अवस्था वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चालत असते. त्या वेळी भिरुड किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे समजावे. अशा वेळी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता त्याचे उच्चाटन करावे. याची सोपी पद्धत आहे. सर्वप्रथम झाडाचे निरीक्षण करुन भिरुड सध्या कोणत्या भागात सक्रिय आहे हे शोधावे. एक लहान काटी घेऊन झाडाच्या बुंध्यावर वाजवत पुढे सरकावे. जिथंपर्यंत धब्ब धब्ब असा आवाज येत राहील तिथपर्यंत वाजवत पुढे सरकावे. अचानक खट्ट खट्ट असा आवाज सुरू झाला की आपण ओळखायचं याच भागात भिरुड सक्रिय आहे. कारण तेथून पुढे झाडाचे खोड जिवंत आणि ओले असते. धब्ब धब्ब असा आवाज यायचा बंद झाला की त्या ठिकाणी खोडाचे साल खुरप्याने किंवा अन्य अवजाराने खरडून काढावे. त्या ठिकाणी करंगळीपेक्षा कमी व्यासाची छिद्रे असतात. ती सर्व छिद्रे शोधून मोजून घ्यावीत. त्यानंतर धुरीजन्य कीटकनाशक (गॅस तयार होणारा ) क्लोरोपायरीफाॅस यासारखे तत्सम विषारी औषध आणावे. २ लीटर पाणी घेऊन त्यामध्ये ५० मिली क्लोरोपायरीफाॅस व अर्धा ली‌टर राॅकेल मिसळून द्रावण तयार करावे. त्यामध्ये घरातील जुन्या कापडाचे किंवा कापसाचे विती किंवा टीचभर‌ मापाचे बोळे आवश्यकतेनुसार तयार करावेत व ते सर्व कापडाचे बोळे विषारी औषधाच्या द्रावणात बुडवून ठेवावेत. कापडाचे बोळे काडीच्या साहाय्याने त्या छिद्रामध्ये जेवढे जातील तेवढे बोळे सरकवावे. जेणेकरून छिद्रे बंद होतील. सर्व छिद्रे बंद झाल्यावर पाच किलो गायीच्या शेणामध्ये वरील विषारी द्रावण मिसळून एकजीव करावे व त्या शेणाने झाडांच्या खरडून काढलेल्या बुंध्यावर लिंपून घ्यावे. सर्व छिद्रे बंद होतील हे पाहावे. या पध्दतीने भिरुड किडीचे कायमचं उच्चाटन होईल व मृत खोडाचे पुन्हा पुनरुज्जीवन होण्यास सुरुवात होईल.

Web Title: Agriculture officials in Gondia interact directly with Chafal farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.