येरळवाडी तलाव मायणी पक्षी संवर्धनमधून वगळण्याबाबतचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:58+5:302021-06-17T04:26:58+5:30
वडूज : मायणी पक्षी संवर्धन राखीवमधून येरळवाडी तलाव वगळण्यासाठी बनपुरी येथे येरळवाडी धरण बचाव समितीमार्फत सुरू करण्यात आलेले ...

येरळवाडी तलाव मायणी पक्षी संवर्धनमधून वगळण्याबाबतचे आंदोलन स्थगित
वडूज : मायणी पक्षी संवर्धन राखीवमधून येरळवाडी तलाव वगळण्यासाठी बनपुरी येथे येरळवाडी धरण बचाव समितीमार्फत सुरू करण्यात आलेले उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. याबाबत प्रांताधिकारी, तहसीलदार, आंदोलनकर्ते आणि वनविभागाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तर १६ जुलैपर्यंत तोडगा न निघाल्यास बनपुरी, येरळवाडी, अंबवडे, नढवळ आदी गावातील ग्रामस्थ तलावांमध्ये जलसमाधी घेतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
मायणी पक्षी संवर्धन राखीवमधून समूह क्रमांक २ येरळवाडी तलाव वगळण्यासाठी येरळवाडी धरण बचाव समितीमार्फत दोन दिवसांपासून खटाव तालुक्यातील बनपुरी येथे उपोषण सुरू होते. याबाबत घटनास्थळी प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे यांच्यासोबत उपोषणकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. या वेळी प्रांताधिकारी जर्नादन कासार यांनी आपल्या तीव्र भावना योग्य असून त्या शासनदरबारी मांडू, असे आश्वासन दिले. तहसीलदार किरण जमदाडे यांनीही आंदोलक शेतकरी ग्रामस्थांचे आभार मानले. वनाधिकारी शीतल फुंदे यांनीही ग्रामस्थांची मागणी वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचवली जाईल असे स्पष्ट केले.
या आंदोलनास राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर तसेच विविध गावांतील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बाळासाहेब पोळ, नाना पुजारी, हणमंत देशमुख, हणमंत इनामदार, मोहन बागल, शंकर देवकर, सोमनाथ पाटील, लक्ष्मण काळे, विजय देवकर, गोपीनाथ शिंदे, बापूराव देवकर, विजय बागल, नवनाथ पोळ यांना प्रशासनाच्या वतीने लिंबू सरबत देण्यात आले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
चौकट .
रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आली अन् जीव भांड्यात पडला...
उपोषणकर्त्यांची कोरोनाची रॅपिड चाचणी करण्यासाठी आरोग्य विभागाची गडबड सुरू होती. परंतु प्रांत व तहसीलदार यांच्याशी बैठक झाल्याशिवाय चाचणी करणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. त्यानंतर उपोषणास बसलेल्या सर्वांची रॅपिड चाचणी करण्यात आली. यामध्ये सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे संबंधितांचा जीव भांड्यात पडला.
फोटो : बनपुरी, ता. खटाव येथे प्रांताधिकारी जर्नादन कासार व तहसीलदार किरण जमदाडे यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन आंदोलनकर्त्यांनी उपोषणाला तात्पुरते स्थगित केले. (छाया : शेखर जाधव )