हळद गेली वाहून, वीज झाली गायब

By Admin | Updated: April 13, 2015 00:06 IST2015-04-12T22:21:10+5:302015-04-13T00:06:42+5:30

कऱ्हाड तालुक्याला अवकाळीचा दणका : ऊसतोडणी ठप्प; फळभाज्या, कलिंगडाचे लाखोंचे नुकसान

After the turmoil, electricity disappeared | हळद गेली वाहून, वीज झाली गायब

हळद गेली वाहून, वीज झाली गायब

मसूर : पाडळी (हेळगाव), ता. कऱ्हाड येथे झालेल्या अवकाळी पावसाने शिजवून वाळत घातलेली हळदच पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून गेली असल्याने हजारोंचे नुकसान झाले आहे, तसेच विजेचे खांब कोलमडले आहेत. त्यामुळे काही परिसरातील वीजच गायब झाली आहे. गारांसह पडलेल्या पावसाने ऊसतोडणी ठप्प झाली आहे. फळभाज्यांचेही नुकसान झाले आहे, तर कलिंगडाचे उशिरा लावलेल्या पिकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.याबाबत माहिती अशी की, पाडळी परिसरात दोन-तीन दिवसांपासून हुलकावणी देत असलेल्या पावसाने शनिवारी रौद्ररूप धारण करत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काही कळायच्या आतच बाळासाहेब जाधव यांची शिजवून वाळत घातलेली हळद वाहून गेली. शेतात पाणी साचले व त्याचा लोंढा हळद वाळत घातलेल्या ठिकाणी आला. त्या पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाळत घातलेली ही हळद वाहून गेली. त्यामुळे त्यांचे हजारोंची हळदच पाण्यात गेली आहे. वारे एवढे प्रचंड होते की त्यामुळे विजेचे खांब कोलमडून पडले आहेत. परिणामी काही ठिकाणी रात्रीपासून वीज गायब झाली आहे. तर श्रावण आनंदा पिंंपळे (पाडळी) यांच्या घराचा पूर्ण पत्रा उडून गेला आहे. घराची भिंंत पडून हजारांचे नुुकसान झाले आहे. तसेच शेवग्याची सुमारे ५० झाडे मोडून पडली. दीड एकर मका भुईसपाट होऊन सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे.
सुनील माळी यांचे गुरांचे शेड उडून पूर्णपणे बाजूला पडले आहे. त्यांचे २५ हजारांचे नुकसान झाले. तर कांता आण्णा जाधव यांची अर्ध्या एकरातील मका जमीनदोस्त होऊन २५ हजारांचे नुकसान झाले आहे. कालगाव परिसरातही पावसाने हजेरी लावल्याने उसाचे पीक भुईसपाट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारोंचे नुकसान झाले आहे. वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडल्याने शेतीची कामे ठप्प झाली. तसेच भाजीपाल्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
हेळगाव परिसरात शाळू व गहू काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. परिसरात कडब्याची पसर तशीच आहे. तर उसाची तोडणी सुरू असून, त्यामध्येही पावसाने व्यत्यय आणल्याने ऊसतोडणी मजुरासह शेतकरी वर्ग चिंतेमध्ये आहे. यावर्षी उसाचे पीक शेतातच राहते की काय, या काळजीने शेतकरी वर्गाने सुरुवातीला मिळेल त्या कारखान्याची तोड घेऊन ऊसतोडणी करण्याचा प्रयत्न केला; परंतु यातूनही जो ऊस शेतात उभा आहे. त्याची तोडणी केव्हा होणार याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष आहे. अशातच चालू तोडणीत पावसाने व्यत्यय आणल्याने आता तर शेतकरी गांगरून गेला आहे. तर टोमॅटो, वांगी या पालेभाज्यांचे गारांच्या पावसाने नुकसान झाले आहे. उशिरा लागवड केलेले कलिंगडाचे पीक नुकतेच बहरात आले होते. तोच आता गारांचा मार बसल्याने हे पीक खराब होणार असल्याने लागवडीचा खर्च तरी निघतोय का नाही, अशी परिस्थीती निर्माण झाली आहे.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
दरम्यान, मसूर व परिसरात यापूर्वीही अवकाळी पाऊस झाला होता. आतापर्यंत चार ते पाचवेळा पावसाने दणका दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. (वार्ताहर)

फलटण पूर्व भागात नुकसान
पंचनाम्याचे आदेश : विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून पाहणी
वाठार निंबाळकर : फलटण तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार दीपक चव्हाण यांनी केली. त्यावेळी त्यांनी तहसीलदार विवेक जाधव व प्रशासकीय यंत्रणेला नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना केली.
फलटण तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. हणमंतवाडी, तामखडा, शिंदेनगर, आसू, पवारवाडी या गावांतील पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस, मका, कडवळ, टोमॅटो यासह फळबागा आणि भाजीपाल्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार दीपक चव्हाण यांनी केली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दोघांनीही संबंधितांनी दिले आहेत.
यावेळी जितेंद्र पवार, शिवाजी पवार, मोहन पवार, अशोक शिंदे, नितीन शिंदे, वसंत शिंदे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध गावातील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)


धान्य वाळविणाऱ्यांची तारांबळ...
खटाव : खटाव व परिसराला दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. या पावसाचा फटका टोमॅटो पिकाला बसणार आहे. तसेच या पावसामुळे धान्य वाळविणाऱ्यांची तारांबळ उडाली होती. खटाव तालुक्यात आतापर्यंत चार ते पाचवेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान केले आहे. दोन दिवसांपूर्वीही खटावसह परिसरात मुसळधार पावसास सुरुवात झाली. बघता-बघता रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागले होते. काही लोकांनी धान्य वाळविण्यास घातले होते. या पावसामुळे धान्य भरण्यासाठी त्यांची गडबड उडाली होती. या अवकाळी पावसाचा फटका खटाव व परिसरातील कांदा आणि टोमॅटो पिकांना बसणार आहे.

Web Title: After the turmoil, electricity disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.