पाऊस येताच पूल पाण्याखाली!

By Admin | Updated: July 15, 2015 21:13 IST2015-07-15T21:13:30+5:302015-07-15T21:13:30+5:30

कास भागातील लोकांचे दुखणे : संरक्षक कठड्यांअभावी पाण्याखाली जात असल्याने वाहतुकीस धोका

After the rain came down the pool! | पाऊस येताच पूल पाण्याखाली!

पाऊस येताच पूल पाण्याखाली!

पेट्री : सातारा-बामणोली रस्त्यावर असलेल्या कास पुलाची उंची कमी असून, पुलाच्या दोन्ही बाजूंस संरक्षक कठडे नसल्याने हा पूल पावसाळ्यात वाहतुकीस धोकादायक बनू लागला आहे.सातारा शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर कास, ता. जावळी गाव आहे. कास तलावाच्या दक्षिणेस धोकादायक वळणावर हा पूल असून, या पुलाच्या दक्षिणोत्तर बाजूस फक्त रक्षक दगड असून, दोन्ही बाजूंस संरक्षक कठड्यांचा अभाव आहे. या पुलाची उंची चार ते पाच फूट असल्याने कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मोठ्या पावसात दरवर्षी या पुलावरून तीन-चार फुटांवरून पाणी वेगाने वाहते.
३५ ते ४० फूट लांबीपर्यंत हा पूल पाण्याखाली जातो. यामुळे अरुंद रस्त्याचादेखील अंदाज येत नाही. तसेच पुलाच्या उत्तरेला गवत, लहान झाडेझुडपे वाढली असल्याने या ठिकाणची धोकादायक परिस्थिती पाहता पुलावरून पाणी वाहत असताना हा पूल दळणवळणात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो.
यंदाच्यावर्षी जून महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर कास पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अशी परिस्थिती कित्येक वर्षे पावसाळ्यात बहुतांशवेळी होताना दिसते.
साताऱ्याच्या पश्चिमेला कास-बामणोली भागात अतिवृष्टीचे प्रमाण अधिक आहे. सातारा-बामणोली मार्गावरील कास तलावाच्या दक्षिणेस रस्त्यावर असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने मुसळधार पावसात कास तलाव पूर्णपणे भरून वाहू लागला की हा पूल पाण्याखाली दिसेनासा होतो. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असते. वेळेत आपल्या कार्यालयात पोहोचणाऱ्या नोकरदारवर्गाची तारांबळ उडते.
परिसरातील धबधबे निसर्गदृश्य पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना माघारी फिरावे लागत असल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त होताना दिसते. या पुलावरून पाणी वाहू लागले की, पलीकडील वाहने पलीकडे तर पुलाच्या अलीकडील वाहने अलीकडे अडकून पडतात. अनेकवेळा पश्चिम भागातील गावांचा संपर्क तुटतो.
साताऱ्याहून बामणोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने व सध्या निसर्गरम्य पर्वणीचा आस्वाद घेण्याचा हंगाम असल्याने पर्यटकांसह वाहनचालकांच्या सोयीसाठी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे भविष्यात येणारे दुर्दैवी प्रसंग टाळले जाऊ शकतात. तसेच संरक्षक दगडावरून पाणी वाहताना पूल ओलांडू नये, हा दर्शनी फलकच बहुतांशी पाण्यात असतो. कास रस्त्यावर दुरवस्थेत असलेला हा फलक वाहनचालकांच्या सहज निदर्शनास येणे आवश्यक आहे. यामुळे कास पुलाची उंची वाढविण्याची मागणी विद्यार्थी, पर्यटक, नोकरदारवर्ग व सर्व वाहनचालकांकडून होत आहे, प्रशासनाने लोकांच्या गैरसोयीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)
पुलांची उंची वाढविण्याची मागणी
पावसाळ्यात बहुतांश वेळा हा पूल पाण्याखाली जाऊन या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग प्रचंड असतो. तसेच पुलावरून मोठी वर्दळ असल्याने व दोन्ही बाजंूच्या धोकादायक वळणामुळे विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संरक्षक कठड्यांसहित पुलाची उंची वाढविण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे.
कास पुलावरून पाणी वाहताना बऱ्याचदा हुल्लडबाजी व स्टंटबाजी करणारी तरुणाई बेभरवशावर प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून आपली वाहने पलीकडे घालण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मोठा अपघाताची संभावना अधिक आहे. तसेच तातडीने वैद्यकीय सेवा भासल्यास वाहतुकीस कोणताही अडथळा होऊ नये, यासाठी उपाययोजना तत्काळ होणे आवश्यक आहे.
- बाबूराव भोसले, पर्यटक

Web Title: After the rain came down the pool!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.