क्षेत्राबाहेरच्या शेतीला फायदा

By Admin | Updated: November 20, 2015 00:16 IST2015-11-19T23:21:38+5:302015-11-20T00:16:21+5:30

बाणगंगा धरण : पाणी उशाला असूनही पिके जळण्याचा धोका

The advantage of out-of-field farming | क्षेत्राबाहेरच्या शेतीला फायदा

क्षेत्राबाहेरच्या शेतीला फायदा

फलटण : बाणगंगा धरणातील उपलब्ध पाणीसाठा शासन निर्णयानुसार राखून ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांऐवजी बाहेरील शेतीला त्याचा लाभ होत आहे. लाभ क्षेत्रातील पिके उशाला पाणी असूनही जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बाणगंगा नदीवर असलेल्या बाणगंगा धरणाची पाणी साठवण क्षमता ६.४९ द.ल.घ.मी. असून, सध्या या धरणात १. २८ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध आहे. तथापि, दि. ७ सप्टेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार धरणातील पाणीसाठे पिण्यासाठी राखून ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय धरणातील पाणी वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंत्यांच्या अखत्यारित असलेल्या बाणगंगा धरणातील पाणी साठ्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दि. ३० आॅक्टोबर रोजी लेखी स्वरूपात पाठविली आहे. लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी पाण्याची मागणी असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तथापि, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतेच निर्देश प्राप्त झाले नसल्याचे नीरा उजवा कालवा कार्यालयातून सांगण्यात आले.
दरम्यान, बाणगंगा धरणाच्या लाभक्षेत्रात १०३६ हेक्टर क्षेत्र असून, आज जवळपास या संपूर्ण क्षेत्रात रब्बीची पिके उभी आहेत. यापूर्वी झालेल्या पावसावर आणि काही प्रमाणात विहिरींच्या पाण्यावर ही पिके आतापर्यंत उभी राहिली. मात्र, आता विहिरीतील पाणीसाठा संपुष्टात आल्याने धरणात उपलब्ध असलेल्या पाण्याची एक पाळी या पिकासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे पाटबंधारे खात्याचे अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडेही केली आहे. मात्र कोणीच त्यांची दाद घेत नसल्याने या शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या निर्णयाच्या विरोधात प्रखर आंदोलन छेडण्याच्या विचारात शेतकरी आहेत.
आतापर्यंत मोठ्या मेहनतीने आणि कष्टाने आणलेली भुसार पिके केवळ एक पाणी न मिळाल्याने जळून जाण्याचा धोका आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत ही पिके हातची गेल्याने लाभक्षेत्रातील या शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

बेसुमार पाणी उपसा सुरू
लाभक्षेत्रातील दालवडी, मांडवखडक, तरटेवस्ती (वाठर-निंबाळकर) वाखरी आदी गावातील सुमारे ३० ते ४० शेतकऱ्यांनी उपसा सिंचनासाठी परवानग्या घेऊन सुमारे १२० हेक्टर क्षेत्रासाठी याच बाणगंगा धरणातून विजेच्या पंपाद्वारे बेसुमार पाणी उपसा सुरू ठेवला आहे. या शेतकऱ्यांना १२० हेक्टर पैकी ३७ हेक्टर क्षेत्र प्रवाही पद्धतीने आणि ८३ हेक्टर क्षेत्रास ठिबक सिंचनाद्वारे पाणी वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. तथापि, प्रत्यक्षात प्रवाही आणि ठिबक सिंचनाद्वारे किती क्षेत्र भिजविले जाते याचे मोजमाप केले जात नसल्याने सध्याच्या भीषण दुष्काळी व टंचाई परिस्थितीतून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना डावलून बेसुमार पाणी उपशाला कोणीही मर्यादा घालण्यास पुढे येत नाही.


हक्काचे पाणी त्यांना नियम
ज्यांच्या हक्काचे पाणी त्यांना मात्र, कायदे नियम दाखविले जात असल्याने त्यांची उभी पिके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन योग्य निर्णय घेऊन लाभक्षेत्रातील व लाभक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा. दोन्ही क्षेत्रांतील पिके जळणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: The advantage of out-of-field farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.