कोरोनामुक्तीसाठी प्रशासनाची धावाधाव; रुग्णसंख्येला अटकाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:41+5:302021-06-17T04:26:41+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांवर गेली असली तरी सध्या केवळ ३३६ रुग्ण असून, यापैकी १३५ ...

कोरोनामुक्तीसाठी प्रशासनाची धावाधाव; रुग्णसंख्येला अटकाव !
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांवर गेली असली तरी सध्या केवळ ३३६ रुग्ण असून, यापैकी १३५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या चार दिवसात रुग्णसंख्या ३०पेक्षा कमी आल्याने तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे. मात्र, यासाठी प्रत्येक गावात काटेकोर नियोजन करुन कोरोनावर शेवटचा घाव घालण्याची गरज आहे.
खंडाळा तालुक्यात झपाट्याने वाढत गेलेली कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले आहेत. प्रत्येक गावात स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी, यासाठी गावोगावी उपाययोजना केल्या आहेत. विशेषत: खंडाळा व लोणंद नगर पंचायत क्षेत्रासह शिरवळमध्ये प्रशासनाने नियम काटेकोरपणे राबवून कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे.
खंडाळा तालुक्यातील ६३ गावांमध्ये कोरोनाने हातपाय पसरले आहेत. कोरोनाची एकूण रुग्णसंख्या १०,२४१पर्यंत पोहोचली आहे. सध्या बाधितांपैकी शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १५६, लोणंद केंद्रांतर्गत ११२ तर अहिरे केंद्रांतर्गत ६८ जण बाधित आहेत. यापैकी केवळ १३५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत तर इतर विलगीकरण कक्षात आहेत. गेल्या चार दिवसात बाधितांची संख्या ३०पेक्षा कमी आल्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.
चौकट :
लसीचा पुरवठा आवश्यक...
तालुक्यात खंडाळा ग्रामीण रुग्णालय, शिरवळ, अहिरे, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर उपकेंद्रांत लसीकरण मोहीम सुरू आहे. तालुक्यात १८ वर्षांवरील एकूण १ लाख ९ हजार ६१२ जण लसीकरणासाठी पात्र आहेत तसेच १८ ते ४४ वयोगटातील ६०,४७५ लोकांपैकी ३,००७ जणांचा लसीचा पहिला डोस झाला आहे तर ४५ वर्षांपुढील ४९,१३७ लोकांपैकी ३३,२८५ जणांना लसीकरणाचा पहिला डोस मिळालाय. तर यापैकी केवळ ६,६३८ जणांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. मात्र, लसीकरणाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करुन प्रत्येक गावी शिबिर घेतल्यास कोरोनाचा धोका आणखी कमी होऊ शकतो.
फोटो दि. १६ खंडाळा कोरोना नावाने...
फोटो ओळ : खंडाळा तालुक्यात तयार करण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्षाची पाहणी आमदार मकरंद पाटील यांनी केली. (छाया : दशरथ ननावरे)
..............................................................