ग्रामपंचायत निवडणुकींसाठी प्रशासन सज्ज, कराड तालुक्यात १३१ मतदान केंद्रांवर होणार मतदान
By प्रमोद सुकरे | Updated: December 17, 2022 15:48 IST2022-12-17T15:46:37+5:302022-12-17T15:48:26+5:30
कराड : कराड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या, रविवारी (दि १८) मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासन सज्ज ...

ग्रामपंचायत निवडणुकींसाठी प्रशासन सज्ज, कराड तालुक्यात १३१ मतदान केंद्रांवर होणार मतदान
कराड : कराड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या, रविवारी (दि १८) मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासन सज्ज झाले असून आज, शनिवारी सकाळपासून सर्व मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांसह साहित्य पोहोचवण्याची लगबग कराड येथे दिसून आली. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रावर साहित्य व कर्मचारी पोहोचलेची माहिती तहसीलदार विजय पवार यांनी दिली.
कराड तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. पैकी ११ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने प्रशासनावरचा काही प्रमाणात ताण कमी होण्यास मदत झाली. मात्र प्रत्यक्षात ३३ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे.
आज, सकाळी १० वाजल्यापासूनच कराड तहसीलदार कार्यालयातून १३१ मतदान केंद्रांसाठी सर्व साहित्य व ५४५ वर कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. वेगवेगळ्या वाहनातून निवडणुका असणाऱ्या गाव व मतदान केंद्रांनिहाय साहित्य व कर्मचाऱ्यांना वाहनातून पाठवण्यात आले. दुपारपर्यंत सर्व साहित्य व कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले होते.
निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी तहसीलदार विजय पवार यांच्यासह निवडणूक विभागातील विनायक पाटील, युवराज काटे, युवराज पाटील, निलेश येडपलवार यांच्यासह कर्मचारी परिश्रम घेत आहेत.