जिल्ह्यात १७३ प्राथमिक शिक्षक अतिरिक्त
By Admin | Updated: July 25, 2014 22:14 IST2014-07-25T21:37:06+5:302014-07-25T22:14:43+5:30
शिंदे : शिक्षणमंत्र्यांसमवेत लवकरच बैठक

जिल्ह्यात १७३ प्राथमिक शिक्षक अतिरिक्त
सातारा : ‘जिल्ह्यात ‘आरटीई’नुसार १७३ प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत, तर १२६ जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या अनुषंगाने लवकरच शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासमवेत बैठक घेणार आहे,’ अशी माहिती जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे) तथा पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळाला दिली.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाबाबत पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. मंत्री शिंदे यांनी सुरुवातीला शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाकडून तसेच अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी मंत्री शिंदे यांनी विविध विषयांवर चर्चा केली.या बैठकीस आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, कृषी समिती सभापती किरण साबळे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य रवी साळुंखे, सतीश चव्हाण, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, उपशिक्षणाधिकारी तानाजी नरळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मंत्री शिंदे यांनी सुरुवातीला शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाकडून तसेच अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कऱ्हाड तालुक्यात १५, जावळी ४, वाई १८, कोरेगाव १३, सातारा ३१, फलटण ५०, खटाव २३, खंडाळा १९ असे एकूण १७३ प्राथमिक शिक्षक अतिरिक्त होत आहेत. पाटण तालुका ४८, माण २३ तर महाबळेश्वर तालुक्यात ५५ असे एकूण १२६ प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. याबाबत ‘आरटीई’नुसार सप्टेंबर २०१३ नुसार समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे.