जोडला ओढा; ठिबककडे ओढा !
By Admin | Updated: April 3, 2015 00:44 IST2015-04-02T23:17:42+5:302015-04-03T00:44:26+5:30
‘दुष्काळी किवळ’चा शिक्का पुसणार : ग्रामस्थांच्या धडपडीला प्रशासनाचेही पाठबळ

जोडला ओढा; ठिबककडे ओढा !
जगन्नाथ कुंभार - मसूर -किवळ, ता. कऱ्हाड येथे पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत सुरू असलेला साडेसात लाख रुपये खर्चाच्या ओढाजोड प्रकल्पात पाणलोट कार्यक्रमाचा कळसच गाठण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सुमारे २०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.ओढाजोड प्रकल्प लोकसहभाग, सह्याद्री सहकारी साखर कारखाना, जलयुक्त शिवार अभियान, जैन इरिगेशन लिमिटेड यांचे संयुक्त विद्यमाने साकारत आहे. ओढाजोड प्रकल्प खोडजाईवाडी साठवण तलावाच्या खालच्या बाजूस असणारा गावओढा ते लेंढोर ओढा असा ३२० मीटरचा होत असून, यामुळे २०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच लेंढोर ओढ्याच्या खालच्या बाजूस गावाला पाणीपुरवठा करणारी गावविहीर असल्याने गावाचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांच्यातून व शेतक-यांच्यातून समाधान दिसून येत आहे.
किवळ या गावाला ‘जलयुक्त शिवार’ अभियानातून डॉ. अविनाश पोळ व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार सुधाकर भोसले, तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद मांगले, सह्याद्री सहकारी साखर कारखाना यांनी सहभाग दर्शवून ओढाजोड प्रकल्प केल्यास गावचे २०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत येईल म्हणून सर्वांनीच याकडे मदतीचा ओघ दिला व गावातील ग्रामस्थांच्या सहकार्यातून सध्या गावचे क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होत आहे.
खोडजाईवाडी साठवण तलावाच्या खालच्या बाजूस असणारा गावओढा या ओढ्याला साठवण तलावातून पाणी सोडल्यास तेच पाणी लेंढोर ओढ्याला जाऊन मिळणार आहे. आणि यातूनच गावाचा शेतीचा विकास साधण्यास मदत होणार आहे.
मसूरच्या पूर्वेस दुष्काळग्रस्त गाव म्हणून किवळ गावाचा उल्लेख केला जात होता. परंतु या गावाने पाण्यासारख्या गंभीर विषयाकडे डोळेझाक न करता शासनाच्या मिळेल त्या योजनेतून पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्याचे महत्त्वाचे काम केले. गावामध्ये ठिकठिकाणी ‘पाणी वाचवा देश वाचवा,’ अशा प्रकारचे फलक लावून लोकांनाही पाण्याची महती सांगणारे संदेश देण्यात आले आहेत. तसेच शेतामध्ये पाण्याचे प्रमाण कमी प्रमाणात देता यावे म्हणून ठिबक सिंचन बसवून घ्या व चांगले उत्पन्न घ्या, अशा आशयाचे फलकही लावून जनजागृती केली आहे. आज किवळला पाण्याची कसलीही टंचाई दिसून येत नाही. हेच सर्व ग्रामस्थांनी मिळून पाणलोटसाठी केलेल्या कामाचे फलित आहे. आणि आता तर ओढाजोड प्रकल्पातून गाव एक वेगळाच पॅटर्न राबवत असल्याने शेतकरी बांधवांच्या आनंदाला उधाण आले आहे.
भविष्यात डोंगरमाथ्यावरील वनाचे संरक्षण होण्यासाठी पाणी अडविण्यासाठी डीपीसीसीटी ,अर्धंनस्ट्रक्चर, माती नालाबांध, सिमेंट बंधारे, वनतळी आदीच्या माध्यमातून वनविभागाच्या सहकार्याने पाणलोट विकास अधिक सक्षम करण्याचा मानस आहे.
- सुनील साळुंखे,
उपसरपंच किवळ
गावातील शेती अधिकाधिक कशी ओलिताखाली येईल, यासाठी आम्ही ग्रामस्थांच्या सहकार्याने सतत प्रयत्नशील असून, यापुढेही उर्वरित क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून विशेष प्रयत्न करणार आहे.
-संगीता साळुंखे,
अध्यक्षा,
माई चॅरिटेबल ट्रस्ट किवळ